Purna Hivra Road Repair Demand
पूर्णा : तालुक्यातील पूर्णा ते पांगरा मार्गे हिवरा या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून मजबुतीकरण करावे, या मागणीसाठी उबाठा शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत पक्षाचे तालुका प्रमुख छगनराव मोरे, मंचकराव जोगदंड, खुशाल भोसले, गोविंद काळे, अशोक ढोणे, राजू ढोणे, विठ्ठल शिंदे, दतराव पवार, बाबाराव पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
पूर्णा ते हिवरा गावापर्यंतच्या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत लातूर येथील मे. आशीर्वाद कन्स्ट्रक्शनने सुमारे दीड वर्षापूर्वी हाती घेतले होते. मात्र, संबंधित कंत्राटदार देशमुख यांच्या कथित हलगर्जीपणामुळे हे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मोंटेकार्लो कंपनीकडून कोणतीही वाहतूक परवानगी न घेता या रस्त्यावरून हायवा व जड टिप्परद्वारे मेटलची वाहतूक करण्यात आल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
या प्रश्नावर समृद्धी महामार्गाचे अभियंते, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंते, तहसीलदार आणि ग्रामस्थांची तहसील कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीत मोंटेकार्लो कंपनीने खराब झालेल्या रस्त्यावर मुरूम व मजबूत जीएसबीचा जाड थर टाकून रस्ता दुरुस्त करण्याचे मान्य केले होते. कंपनीचे व्यवस्थापक रामगोपाल राणा यांनीही यास होकार दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाला वर्ष उलटूनही रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे मोंटेकार्लो कंपनीने तातडीने रस्त्याचे मजबुतीकरण करावे तसेच पावसाळ्यानंतर आशीर्वाद कन्स्ट्रक्शनने डांबरीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी उबाठा शिवसेनेने केली आहे. येत्या आठ दिवसांत रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू न झाल्यास शिवसेना आणि ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोकोसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, पूर्णा तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके सुकण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणीही उबाठा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, हळद, मूग, उडीद, कापूस आणि तूर या खरीप पिकांवर संकट ओढवले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.