Four Arrested in Purna  Pudhari
परभणी

Purna Attack Case | गौर येथे कत्तीने हल्ला प्रकरणी चार आरोपी अटकेत; चुडावा पोलिसांची कारवाई

गोरखनाथ रामा पारवे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पाच आरोपी फरार झाले होते

पुढारी वृत्तसेवा

Four Arrested in Purna

पूर्णा : तालुक्यातील गौर येथे १७ एप्रिल रोजी रात्री किरकोळ वादातून एका युवकावर कत्तीने हल्ला केल्याप्रकरणी पळून गेलेल्या आरोपींपैकी चार जणांना चुडावा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची नोंद चुडावा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखनाथ रामा पारवे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पाच आरोपी फरार झाले होते. त्यापैकी संतोष सावळे, सुजित सावळे, बालाजी सावळे आणि योगेश अंभोरे या चार आरोपींना पोलिसांनी नांदेड येथून पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, पोलीस उपनिरीक्षक अरुण मुखेडकर तसेच नारमोड, मिटके, आईटवार, ससाणे, रेड्डी, कौटकर आदींच्या पथकाने केली.

दरम्यान, २७ एप्रिल रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादातून गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही युवक रस्त्यावर दुचाकी आडवी लावून वाढदिवस साजरा करत असताना त्यांना बाजूला होण्यास सांगितल्याने वाद झाला. त्यातूनच एका युवकावर कत्तीने वार करत गळा आणि गालावर गंभीर जखमा केल्याची घटना घडली होती.

या घटनेनंतर संतप्त जमावाने एक स्कॉर्पिओ वाहन जाळल्याची घटना घडली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. फरार आरोपींचा शोध सुरू असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT