

Purna Two Tippers Seized
पूर्णा : तालुक्यातील लक्ष्मीनगर–पिंपळगाव बाळापूर परिसरातील नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर महसूल पथकाने पहाटे छापा टाकत कारवाई केली. या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.
या पथकात उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पंढरीनाथ शिंदे, भरत गंगावणे, तलाठी अजय कटके, सुदाम खुणे, सिंगरवाड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
कारवाईदरम्यान एमएच २६ एच ८९८५ आणि एमएच ४०/७६२७ क्रमांकाचे दोन टिप्पर विनापरवाना रेती वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आले. संबंधित वाहने तहसील कार्यालयात आणून जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी स्तरावरून काही ठिकाणी अधिकृत वाळू घाटांचे लिलाव करण्यात आले असले तरी काही ठिकाणी रेतीमाफियांकडून अनधिकृतपणे रेती उत्खनन सुरू असल्याचे समोर आले आहे. नदीपात्रात बेकायदेशीर धक्के तयार करून पाणबोटी व जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने अशा अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रंदिवस पाळत ठेवण्यास सुरुवात केली असून, विनापरवाना रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर गौण खनिज कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तरीही काही ठिकाणी पथकाला चकवा देत अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची चर्चा नदीकाठच्या गावांमध्ये सुरू आहे.