

Purna Baliraja Sugar Factory theft
पूर्णा : शहराबाहेरील कानडखेड परिसरातील बळीराजा साखर कारखाना साईटवरील वसाहतीत १८ एप्रिलच्या रात्री धाडसी घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारखान्यात ड्युटीवर असलेल्या सहा कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेत सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
याप्रकरणी एका कर्मचाऱ्याने पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहर व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अधिक माहितीनुसार, पूर्णा-ताडकळस रोडवरील कारखाना परिसरात कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. १८ एप्रिल सायंकाळी ८ ते १९ एप्रिल सकाळी ७ या कालावधीत फिर्यादी परमेश्वर उत्तमराव होंडाळे (वय ४२) यांच्या क्वार्टर (डी-१, रूम क्र. ०७) चे कुलूप तोडून घरात प्रवेश करण्यात आला. कपाटातील सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. याचबरोबर इतर पाच कर्मचाऱ्यांच्या घरांमधूनही दागिने चोरून नेण्यात आले.
चोरी गेलेल्या ऐवजामध्ये साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या (अंदाजे १.५ लाख), पन्नास तोळ्यांचे चांदीचे पायातील वाळे (अंदाजे ३.७५ लाख), इतर सोन्याचे दागिने (२.७५ लाख) आणि एक तोळ्याची सोन्याची एकदाणी (५० हजार) यांचा समावेश आहे. एकूण नुकसान सुमारे ८.५ लाख रुपये इतके आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक १६९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.