परभणी

Pathri city traffic congestion | पाथरी शहरात वाहतूक कोंडी वाढली

सेंटर नाका, बसस्थानक परिसर व सेलू कॉर्नर ‘धोक्याचे झोन’

पुढारी वृत्तसेवा

पाथरी : शहरातील प्रमुख मार्गांवर दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत आहे. सेंटर नाका, बसस्थानक परिसर, सेलू कॉर्नर,सेंटर नाका ते नगर परिषद कार्यलय, चौकबाजार ते डॉक्टर लाईन आदी भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या भागांमध्ये वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ व बसस्थानक परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारे अवैध पार्किंग, हातगाड्या, अतिक्रमणे तसेच बेफिकीर वाहनचालकांमुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. सकाळी खाजगी शिकवणी व कार्यालयांची वेळेस तसेच सायंकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सेलू कॉर्नर,सेंटर नाका ते नगर परिषद कार्यलय,डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर,ग्रामिण रुग्णालय व डॉक्टर लाईन परिसरात रुग्णालयांची संख्या अधिक असल्याने येथे सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र अरुंद रस्ते, वाहतूक नियंत्रणाचा अभाव आणि नो-पार्किंग नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने अनेकदा रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण होत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ व इंधन मोठ्या प्रमाणावर वाया जात असून व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी या भागात किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करणे, अवैध पार्किंगवर कारवाई करणे, अतिक्रमणे हटविणे तसेच प्रमुख चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT