Wai Traffic Issue : वाई शहरात वाहतुकीची समस्या जटील

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त : उपाययोजनांची मागणी
Wai Traffic Issue
वाई शहरात वाहतुकीची समस्या जटील
Published on
Updated on

वाई : वाई शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील एकेरी वाहतुकीचे निर्णय केवळ कागदावरच राहिल्याने प्रत्यक्षात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या शहरातील पार्किंगचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा होणारे बेछूट पार्किग, मालवाहू वाहनांची अनियमित उभी रांग आणि नियमांचे उघड उल्लंघन यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. किसनवीर चौक ते चित्रा टॉकीज हा रस्ता एकेरी घोषित असतानाही दोन्ही बाजूंनी वाहने पार्क केल्यामुळे दुचाकी चालवणेही अवघड झाले आहे.

मांढरदेवकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. एकेरी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून विरुद्ध दिशेने वाहनांची ये-जा सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. महागणपती मंदिर परिसरात, विशेषतः बारक्या पुलावर होणारे पार्किंग वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे.

या सर्व समस्यांना स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नियमभंग करणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने कोणीही कुठेही वाहन उभे करत असल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेतील काही मोजके नगरसेवक पार्किंगच्या प्रश्नावर आवाज उठवत असले तरी अनेक लोकप्रतिनिधी मौन बाळगून असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरातील उपलब्ध मोकळ्या जागांवर नियोजित पार्किंग व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. नगरपालिकेच्या इमारती मागील जागा किंवा मंडई परिसरात ‌‘पे अँड पार्क‌’ योजना राबवल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते आणि पालिकेलाही महसूल मिळू शकतो.

वाई शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी कडक अंमलबजावणी, वाढीव पोलीस बंदोबस्त, नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था आणि प्रशासनाची ठोस भूमिका आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा भविष्यात शहरात चारचाकी वाहन घेऊन फिरणेही कठीण होईल, अशी भीती वाईकरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news