Crime News pudhari photo
परभणी

Parbhani illegal sand mining : अवैध वाळू उपशावर कारवाईस गेलेल्या महसूल पथकावर हल्ला

खुर्लेवाडी येथील घटना; नऊ जणांविरुद्ध गंगाखेड पोलिसांत गुन्‍हा

पुढारी वृत्तसेवा

परभणी : गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर खुर्लेवाडी (ता. पालम) शिवारात हल्ला करून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घडली. कर्मचाऱ्यांचे कपडे फाडून लोखंडी रॉड व बांबूच्या काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

महिपती कांबळे, मारुती पुणे, केरबा आष्टुरकर, संजय चव्हाण, रंगनाथ शेटेवाड, प्रकाश रायभोळे, नयन राठोड, देवानंद शिनगारे व लक्ष्मण जाधव यांच्या पथकाने खुर्लेवाडी येथे वाळू उपशाचे तराफे नष्ट केले.

यावेळी काही व्यक्तींनी पथकाशी वाद घातला. त्यातील एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत त्याला नदीपात्रात ढकलल्याने आग विझली. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण करून मंदिराकडे नेण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिस पथक येत असल्याचे दिसताच संबंधित व्यक्ती पसार झाल्या. महसूल सेवक महिपती कांबळे यांच्या फिर्यादीवरून अक्षय कदम, आकाश अळनुरे, तिरुपती अनुरे, प्रकाश कदम, अनिल गायकवाड, संतोष शिंदे, रोकडोबा शिंदे, महेश कदम व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्‍या भूमिकेवर प्रश्नचिन्‍ह

पालम तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल पथकातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हल्ल्यानंतर तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याची चर्चा असून, कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकासोबत राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, वाळू माफियांकडून अधिकाऱ्यांच्या कथित हप्तेवसुलीच्या आरोपांचीही चर्चा असून, त्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT