

हिंगोली :छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होणारी मंत्री मंडळाची बैठक यावर्षीही होणार नाही. यावरून सरकारला मराठवाड्याच्या विकासासाठी काहीही देणेघेणे राहिलेले नाही हे स्पष्ट होत असून शासनाकडून मराठवाड्याला अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात केला.
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. संतोष टारफे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे, वसीम देशमुख, दिलीप घुगे, रेणुका पतंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर त्यांनी प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी दानवे म्हणाले की, सरकारला मराठवाड्याच्या विकासाचे काही देणे घेणे उरलेले नाही. मराठवाड्याला सातत्याने अन्यायकारण वागणुक दिली जात असून मराठवाड्यातील जनतेवर अन्याय केला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे यापुर्वी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सरकारने मराठवाड्याच्या विकासाठी सुमारे 56 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मात्र हि घोषणा कागदावरच राहिली असून त्यातून केवळ 3300 कोटी रुपये मिळाले आहे. मात्र हा निधी देखील अखर्चितच आहेत. सरकार मराठवाड्याचा विकास करू इच्छीत नाही.
दुर्देवाने सत्ताधारी पक्षाचे लोक झोपलेले असल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला. शासनाने मराठवाड्यातील सिंचनाच्या प्रकल्पाची घोषणा केली. मात्र या प्रकल्पाचे अद्याप सर्वेक्षणच झालेले नाही. नदीजोड प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र त्याचेही सर्वेक्षणच अद्यापही झाले नाही. सिंचनाचे प्रकल्प न झाल्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या खाईत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शासनाने घोषणा कमी अन काम जास्त केले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी गाजावाजा करून हाती घेतलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना फसवी असून आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा झाले याची आकडेवारी शासनाने जाहिर करावी असे दानवे म्हणाले.
१७ सप्टेंबरला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आंदोलन
मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नावर तसेच दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 17 सप्टेंबर रोजी मोठे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात मराठवाड्यातून शेतकऱ्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.