पूर्णा : तालुक्यातील शेतशिवारात यंदाच्या खरीप हंगामात मुग पिक जोमात वाढलं आहे. सध्या मुग पिकाला लदबदून शेंगा लागल्या असून त्या परिपक्व होण्याच्या अवस्थेकडे वळताना दिसून येत आहेत.
औंदा मुगाचा पेरा ३८५ हेक्टरवर झाला असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. त्या पाठोपाठ उडीद १३५ हेक्टर, सोयाबीन ४०७६० हे., कापूस ६४६५ हे., तूर १८६५ हे., हळद १९८० हे.,ऊस ५३५० हे., याप्रमाणे खरीप हंगाम पिक लागवड रिपोर्ट आहे.
दरम्यान, इतर पिकाबरोबरच घरी डाळ खाण्यासाठी प्रत्येक शेतकरी थोडा का होईना मुग पिकाची पेरणी करतात. यंदा सुरुवातीला पेरणीच्या वेळी अल्प पाऊस झाला होता. तरी देखील शेतकऱ्यांनी उशिर नको म्हणून कमी ओलीवरच पेरण्या उरकल्या. त्यानंतर अधूनमधून पावसाच्या कधी हलक्या तर कधी मोठ्या सरी पडल्या.त्या पाऊसाच्या ओलीवर पिकाची उगवण झाली. यातच, मुग पिकाची उगवण शक्ती ही तिनच दिवसात होवून पिक वाढीस लागले. हे पिक केवळ अडीच महिन्यात येणारे असून शेतकरी ते अर्वाजून पेरतात.
मशागत, मावा रोग फवारणी वेळेवर केल्याने पिक चांगले आले असून सध्या शेंगा लागल्या आहेत. अबक पेरणीच्या मुग शेंगा येत्या आठ दिवसांत काढणी तोडणीला येणार आहेत. काही भागात मुग पिक हे मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. कारण मुग काढणीनंतर हस्त नक्षत्रात लगेच त्या क्षेत्रात रब्बी ज्वारी, हरबरा,जवस,करडई हे पीक अबक पेरणी करता येती म्हणून घेतले जाते.