परभणी

Farmers pray for rain: पिकांनी माना टाकल्या; पावसासाठी शेतकऱ्यांचे वरुणराजाला साकडे

निदान विमा भरपाई तरी तात्काळ द्यावी; अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : तालुका परिसरात मागील एका महिन्यापासून पाऊसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होवून खरीपातील उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत.परिणामी, सोयाबीन, मुग, उडिद पिकाला फुल शेंगा लागण्याच्या ऐन अवस्थेत पाऊसाचा दिर्घ खंड पडला आहे.

सध्या जोमात वाढलेली सोयाबीन मुग उडिद ह्या पिकांना नुकत्याच शेंगा वाद्या लगडू लागल्यात. पाऊस नसल्यामुळे जमिनी कोरड्या ठाक पडून भेगाळून जात लगडलेली फुले शेंगा गळून सुकून वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. हाता तोंडाशी येणारे पिकाला जिवदान मिळण्यासाठी आता तुरंत पाऊसाची आवश्यकता आहे. मात्र,पाऊसाचा मागमुस दिसून येत नसून दिवसा कडक उन्हं अन् रात्री टिपूर चांदणं पडत आहे. त्यामुळे मोठी बखाड पडल्याने पिके हातची जातात की काय, म्हणून शेतकरी हवालदिल झाला असून ते वरुणराजाकडे हातजोडून साकडे घालत आहे.

ज्यांच्याकडे शेतात बोअरवेल्स आहेत असे काही मोजके शेतकरी तुषार सिंचन चालू करुन थोडक्या क्षेत्रातील पिक वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहेत. परंतु, या हातच्या पाण्याला पाऊसाच्या पाण्याची सर कधीच येत नाही. त्याचबरोबर पाऊसाचा मोठा खंड पडल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर असतानाच गत वर्षी मोठी अतिवृष्टी होवूनही अद्याप पिक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही. निदान विमा भरपाई तरी तात्काळ द्यावी; अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

हळद कापुस, ऊस पिकांची वाढ खुंटली

दरम्यान, पाऊस पडत नसल्यामुळे कमी कालावधीची सोयाबीन मुग उडिद ही पिके तर वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय,जमीनीत ओलावा नसल्यामुळे हळद ऊस कापूस ह्या दिर्घ कालावधीच्या पिकांची वाढ कमालीची घटली आहे. विहीर बोअरवेल्स ची देखील पाणीपातळी घटली आहे.तेव्हा यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT