परभणी : मनपाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन देशमुखांनी कोणासोबतही युती करायची नसून राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रमुख सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अनेक महिन्यांपासून मनपा निवडणुकीसाठी तयारी चालवली आहे. काही महिन्यापूर्वी अजित पवारांच्या दौऱ्यात काही पक्षप्रवेशही करवून घेण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर मनपा कार्यालयात आढावा बैठकही घेतली होती.
मनपा निवडणुक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा शहराचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी बुधवारी (दि.17) पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस मनपाच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावणार लढवणार असून निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुकांची यादी आपण पक्षश्रेष्टीकडे पाठवणार असल्याचे प्रताप देशमुख म्हणाले. राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता महापौरपदी बसावा. शहर मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची सत्ता असली पाहिजे असेही देशमुख म्हणाले.
त्यांनी आयोजित केलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम निष्ठेने करणाऱ्या मूळ पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुने आणि नवे हा वाद उफाळून आल्याचेही स्पष्ट आहे. काही महिन्यांपूर्वी महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सोपवला होता.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आपणच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून जिल्हाध्यक्ष आहोत असे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीबाबत विचारले असताना पक्षांमध्ये कुठलीही गटबाजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी अक्षय देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वासाठी सुप्त लढाई सुरू असल्याचे वास्तव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जुनी मंडळी प्रताप देशमुख यांच्या समवेत आहे. अक्षय देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नवीन काही पक्षप्रवेशही घडवून आणले आहेत. मनपा निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने स्वबळाची भाषा केली.
आम्हाला कोणासोबत युती करायची नसून आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. निवडणुकीला सामोरे जाताना नागरिकांचाही कल घेतला असून जनता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत उभी राहील असे अक्षय देशमुख यांनी सांगितले. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असली तरी राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचेही स्पष्ट आहे.
स्वबळाची भाषा करताना राष्ट्रवादी काँग्रेसला एक संघपणे निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून धुळमुक्त परभणीचा, दादांचा वादा असा प्रचारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला होता. नगर विकास विभागाच्या विविध योजनांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वारंवार श्रेय वादाची लढाई दिसून आलेलीच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे.
स्वबळाच्या भाषेला आधार
मनपाची स्थापना झाल्यानंतर प्रताप देशमुख यांच्या रूपाने परभणी शहराचा प्रथम महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बनला होता. विसर्जित मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे संख्याबळ 18 इतके होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेला आधार असल्याचे दिसते.