Parbhani Municipal Corporation election: All political parties cautious approach
परभणी, पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस राहिले असताना इच्छुकांची घालमेल वाढली. नेत्यांना बंडोबांची भीती वाटू लागली असून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. प्रमुख राजकीय पक्ष शेवटच्या क्षणाला आपले पत्ते उघड करतील असे चित्र आजघडीला दिसत आहे.
मनपा निवडणुकीत निवडून द्यावयाच्या ६५ जागांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांना कार्यकर्ते सांभाळत उमेदवारी जाहीर करायच्या असल्यामुळे राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा अंतिम कालावधी जवळ येत असल्यामुळे अनेकांनी स्वतःच्या पक्षात उमेदवारी मिळणार नाही, या विचारातून पक्षांतर केल्याचेही दिसत आहे.
सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडेही इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. मविआतील घटक पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र महापालिका निवडणुक संदर्भात हालचाली दिसत नाहीत. एकंदरीत सामान्य परभणीकरांना मनपाच्या माध्यमातून नागरी सुविधा मिळणे मुश्किल झाले असताना महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक असल्याचे दिसत आहेत.
मनपा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष्मी अस्त्राला महत्त्व दिल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बहुतांश ठिकाणी उमेदवारी मिळणे दुरापास्त झाले. प्रमुख राजकीय पक्षांनी मनपासाठी घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत संबंधित कार्यकर्त्याने पक्षासाठी काय कार्य केले हा प्रश्न बाजूला पडल्याचे दिसले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचे योगदान न लक्षात घेता किती पैसे खर्च करू शकता हा मुख्य प्रश्न विचारला.
एकंदरीत बकाल अवस्था प्राप्त झालेल्या मनपामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली असून निवडणुकीनिमित्त शेकडो कोटींचा चुराडा होणार असल्याचे स्पष्ट आहे. अनेक कार्यकर्त्यांनी दोन-तीन वर्षापासून मनपा निवडणूक लढवण्यासाठी तयारी चालवली आहे. त्यादृष्टीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्नही केले. असे अनेक कार्यकर्ते आज पक्षाकडून उमेदवारी मिळते की नाही या भीतीने द्विधा अवस्थेत असून इच्छुकांची घालमेल वाढली असल्याचे चित्र जवळपास १६ प्रभागांमधून दिसून येत आहे.
कार्यकर्त्यांची फाटाफूट होऊ नये, कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नयेत म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसत असून शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर करण्यात येतील असे आजघडीला चित्र आहे. मनपा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी स्वतःच्या पक्षाचे नाव उमेदवारी अर्जावर टाकत पक्षाचा एबी फार्म न मिळाल्यास माघार नको म्हणून दोन-दोन अर्ज दाखल केल्याचे दिसत आहे.
नागरिकांचा काही माजी नगरसेवकांवर रोष
विसर्जित मनपामध्ये सदस्य असलेल्या व पुन्हा मनपा निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक माजी नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रभाग १५ मधील शंकर नगर भागात एका माजी नगरसेवकाला नागरिकांनी अक्षरशः पिटाळून लावले. शहरातील अन्य काही प्रभागांमध्ये ही माजी नगरसेवकांविषयी नागरिकांमध्ये रोष असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांच्या रोषामुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांना मनपा निवडणुकीत हाबाडा बसणार असल्याचे चित्र आहे.