

Yashwant Sena takes power: Road, water and sanitation issues come to the forefront.
पूर्णा, पुढारी वृत्तसेवाः
पूर्णा नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, आता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसमोर कामाचा मोठा डोंगर उभा आहे. प्रशासक राजवटीत दुर्लक्षित राहिलेल्या शहरातील समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे शहराचे विस्कळीत झालेले आरोग्य आणि कोलमडलेली सांडपाणी व्यवस्था सुरळीत करणे, हे नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी मोठी कसोटी ठरणार आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ११ प्रभागांतील २३ नगरसेवकांपैकी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत सेनेने थेट नगराध्यक्षपदासह ७जागा जिंकून पालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राष्ट्रीय काँग्रेस ६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, भाजप (२), शिंदे गट शिवसेना (२), ठाकरे गट शिवसेना (२), जनता दल सेक्युलर (२) आणि शहर विकास आघाडी (२) असे पक्षीय बलाबल आहे.
मागील पंचवार्षिक कार्यकाळ संपल्यानंतर वेळेत निवडणुका न झाल्याने पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती होता. या काळात शहरातील मूलभूत सोयीसुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या गाळाने तुंबल्या असून रस्त्यांवर घाण पाणी साचत आहे. कचऱ्याचे ढिगारे आणि डासांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. घरकुल योजना, घर-जागा आणि प्लॉट नोंदणीतील तांत्रिक अडचणींमुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत.
निकृष्ट कामांची चौकशी होणार?
प्रशासक काळात शहरात काही सिमेंट रस्ते आणि नाल्यांची कामे झाली. मात्र, ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून यात निधीचा मोठा गैरवापर झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. या कामांवर पांघरूण घालण्यात आले असून, आता नूतन पदाधिकारी याची सखोल चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जनतेच्या अपेक्षा वाढल्या
यशवंत सेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शहराचा चेहरामोहरा बदलेल, अशी पूर्णेकरांना आशा आहे. पदभार स्वीकारताच कचरा मुक्त शहर, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, रस्ते दुरुस्ती आणि सुरळीत पाणीपुरवठा या कामांना नूतन पदाधिकाऱ्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.