31st December Celebration |थर्टी फर्स्ट च्या जल्लोषाला एकादशीमुळे ब्रेक, भक्तीला वेग!
नरहरी चौधरी
परभणी, : दरवर्षी जल्लोष, पार्टी आणि जल्लाद उत्साहात साजरा होणारा 31 डिसेंबर यंदा मात्र संयम, श्रध्दा आणि साधेपणाचा संदेश देणारा ठरत आहे. यंदा 31 डिसेंबर रोजी एकादशी तिथी आल्याने नववर्ष स्वागताच्या जल्लोषावर धार्मिक परंपरांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असून, परभणीसह ग्रामीण भागातही वेगळेच चित्र पहायला मिळत आहे.
31 डिसेंबर हा वार बुधवारचा असल्याने अनेक नागरिकांनी तो शुभ मानत हॉटेल पार्टी, कौटुंबिक समारंभ, मित्रमंडळींसोबत सेलिब्रेशन तसेच पर्यटनाचे नियोजन आधीच केलेले होते. मात्र एकादशीच्या दिवशी मांसाहार व मद्यपान टाळण्याची परंपरा हिंदू संस्कृतीत दृढ झालेली असल्याने अनेकांचे नियोजन ऐनवेळी बदलावे लागल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
व्यावसायिक नाराज
परिणामी, अनेक कार्यक्रम रद्द झाले असून काही कार्यक्रम हे 30 डिसेंबर किंवा 1 जानेवारी रोजी हलविण्यात आल्याचेही बोलले जात आहे. याचा थेट परिणाम हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट, क्लब आणि खानावळ व्यवसायावर झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. अनेक ठिकाणी आधीच झालेली बुकिंग रद्द झाली असून, अपेक्षित गर्दी न झाल्याने व्यावसायिक नाराजी व्यक्त करत आहेत. ‘ड्राय डे’ जाहीर नसतानाही केवळ धार्मिक कारणांमुळे ग्राहक संख्येत मोठी घट होणार असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
काही हॉटेल व खानावळ चालकांनी परिस्थितीशी जुळवून घेत शाकाहारी विशेष मेनू, उपवासाचे पदार्थ तसेच कौटुंबिक वातावरणावर भर देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तरीही दरवर्षी मिळणार्या व्यवसायाच्या तुलनेत यंदा उलाढाल घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर तरुणाईमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी सोशल मीडियावर विनोदी पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली असली, तरी अनेकांनी एक दिवस संयम पाळण्यात काहीच हरकत नाही, अशी समजूतदार भूमिका घेतल्या आहेत. जल्लोषाला मर्यादा आल्या असल्या तरी सांस्कृतिक व धार्मिक मूल्यांचे जतन होत असल्याचे समाधानही व्यक्त केले जात आहे. एकूणच, यंदाचा 31 डिसेंबर परभणीत जल्लोषापेक्षा संयम, श्रध्दा आणि साधेपणाचा संदेश देणारा ठरत असून, नववर्षाचे स्वागत भक्तीभावात होणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
भक्तीचा रंग गडद
दुसरीकडे, एकादशीनिमित्त शहरातील तसेच ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. उपवास, भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह तसेच विठ्ठल नामस्मरणासाठी अनेक भाविक सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात संयम, भक्ती आणि सकारात्मक विचारांनी व्हावी, अशी भावना मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसत आहे

