स्फोटामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून घराच्या दोन्ही भिंती कोसळल्या  Pudhari
परभणी

Cylinder Explosion Parbhani | पिंपळा येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; भिंती कोसळल्या, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

Manwat Pingala Gas Cylinder Blast

मानवत : मानवत तालुक्यातील मौजे पिंपळा येथे घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना गुरुवारी (दि. १०) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या स्फोटामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून घराच्या दोन्ही भिंती कोसळल्या. सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

दीपक उर्फ यशवंत गणेश शिंदे यांच्या घरात हा स्फोट झाला. बैलपोळा सणानिमित्त शिंदे कुटुंबीय वडिलांच्या घरी गेले होते. सण साजरा केल्यानंतर रात्रीचे जेवण करून ते तेथेच मुक्कामी थांबले. त्यामुळे घरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक अंदाजानुसार, गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्फोट इतका तीव्र होता की, घराच्या भिंती कोसळून त्यातील दगड उडून शेजारील घराच्या पत्र्यावर पडले. त्यामुळे शेजारील घराच्या पत्र्याचेही मोठे नुकसान झाले.

मध्यरात्री अचानक झालेल्या स्फोटाच्या मोठ्या आवाजाने संपूर्ण पिंगळा परिसर हादरला. आवाज ऐकून अनेक ग्रामस्थ घाबरून घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तहसील प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.

दरम्यान, परभणी येथील भारत गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या दुर्घटनेत शिंदे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT