Manwat domestic gas supply issues
मानवत : मानवत तालुक्यासह शहरात घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शहरातील गॅस पुरवठा इंडेन अंतर्गत कार्यरत असलेल्या एकमेव गॅस एजन्सीमार्फत केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. ऑनलाइन बुकिंग करून पैसे भरल्यानंतरही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत.
बुकिंगनंतर ग्राहकांना एजन्सीकडून पावती दिली जाते आणि त्या आधारे गोडाऊनवर जाऊन सिलेंडर घ्यावा लागतो. मात्र, पावती घेण्यासाठीही एजन्सीसमोर मोठ्या रांगा लागत आहेत. मंगळवार, २४ मार्च रोजी गोडाऊनसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या रांगांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.
परीक्षेचा कालावधी सुरू असतानाही विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, भर उन्हात तासन्तास थांबल्यानंतरही अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
दरम्यान, नोंदणी केलेल्या ग्राहकांना गुरुवार किंवा शुक्रवारी सिलेंडर मिळेल, असे एजन्सीकडून सांगण्यात येत आहे. मात्र, पुरवठा सुरळीत कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे.