मानवत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी रस्त्यावर उतरून स्वच्छता केली Pudhari
परभणी

Manwat Workers Strike | सफाई कामगार संपावर; मुख्याधिकारी झाडू घेऊन रस्त्यावर

कोमल सावरे यांचा स्वच्छतेसाठी पुढाकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही उचलला कचरा

पुढारी वृत्तसेवा

Manwat Municipal Council Chief Officer Sweeps Streets

मानवत : मानवत शहरातील सफाई कामगारांनी २७ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू केल्याने शहरातील नियमित स्वच्छता आणि कचरा संकलन व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.

मानवत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी सोमवारी (दि. १) स्वतः हातात झाडू, टोपले आणि खोरे घेऊन रस्त्यावर उतरून स्वच्छता केली. मुख्याधिकारी स्वतः कचरा उचलताना दिसताच नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. नगर अभियंता सय्यद अन्वर, भागवत भोसले, रामराव चव्हाण, अजय उळते यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागांत साचलेला कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.

सफाई कामगारांचा संप सुरू असल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होत अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर स्वच्छतेबाबतचा आदर्श ठेवला.

सुका-ओला कचरा वेगळा ठेवण्याचे आवाहन

सफाई कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी केले. नागरिकांनी सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करून डस्टबिनमध्ये जमा करावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर कचरा टाकू नये, अशी विनंती त्यांनी केली.

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नगरपरिषद प्रशासनाची नसून नागरिकांचीही आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तो निर्धारित ठिकाणी जमा केल्यास स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मोठी मदत होईल, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले.

मुख्याधिकाऱ्यांच्या पुढाकाराची चर्चा

सफाई कामगारांचा संप सुरू असताना शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असतानाच मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी स्वतः रस्त्यावर उतरले. झाडू, टोपले आणि खोरे हातात घेऊन त्यांनी कचरा संकलन केल्याने नगरपरिषदेच्या या उपक्रमाची शहरात चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT