Manwat Murder Case | अंगाचा थरकाप उडविणारे हत्याकांड; मानवत मर्डर्स! अंधश्रद्धेचा रक्तरंजित इतिहास

Manwat Murder Case |
Manwat Murder Case | अंगाचा थरकाप उडविणारे हत्याकांड; मानवत मर्डर्स! अंधश्रद्धेचा रक्तरंजित इतिहास
Published on
Updated on

सुनील कदम

१९७२ साल म्हणजे जणू काही महाराष्ट्राच्या मुळावर उठलेलं. उभा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत होरपळून निघत होता. लोकांच्या खाण्या-पिण्याचे हाल सुरू होते. दुष्काळाची ही झळ मराठवाड्यालाच जास्त बसत होती. पण, या दुष्काळापेक्षाही एक मोठा वणवा मानवत नावाच्या एका खेडेगावात पेटला होता. अंधश्रध्देच्या आगीतून पेटलेल्या या वणव्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल बारा मुली आणि महिलांचे बळी गेले होते, एका मुलाचाही बळी गेला होता. मानवत हत्याकांड म्हणून देशभर हा खटला गाजला होता. या घटनेवर आधारित एक क्राईम थ्रिलर मराठी वेबसीरिज बनवण्यात आली आहे. त्यातून या घटनेला पुन्हा उजाळा मिळाला आहे. हत्याकांड का व कसे घडले, त्याचा हा स्पेशल रिपोर्ट...

परभणी जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील मानवत हे एक छोटेसे खेडेगाव. १९७२ सालच्या दुष्काळात मराठवाड्याप्रमाणे हे गावही दुष्काळाच्या खाईत होरपळून निघत होते. तशातच नोव्हेंबर १९७२ ते जानेवारी १९७४ या कालावधीत या गावात अंधश्रध्देचाही वणवा भडकला. गावातील दहा-बारा वर्षांच्या मुलीचे एका मागोमाग एक असे मुडदे पडू लागले. विेशेष म्हणजे १४ नोव्हेंबर १९७२ या बालदिनीच या बाल हत्याकांडाची सुरूवात झाली. या दिवशी गयाबाई सखाराम गच्छवे ही दहा वर्षांची चिमुरडी मुलगी गोवऱ्या गोळा करायला म्हणून दुपारी घराबाहेर पडली होती. नेहमी ती घराच्या आसपासच जात असे. पण दिवस मावळून गेला, तरी गयाबाई घरी आली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी तिचा शोध सुरू केला. रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला, तरी गयाबाईचा पत्ता लागला नाही. पुढचे दोन दिवस सगळ्या गावकऱ्यांनी गावभर शोधलं, तरी गयाबाईचा मागमूस लागला नव्हता. तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह उत्तमराव बारहाते याच्या शेताजवळच्या ओढ्यात पडलेला सापडला. तिच्या डोक्यावर मारल्याची खूण आढळली आणि गुप्तांगावर जखम झालेली होती.

या घटनेला जेमतेम पंधरवडा उलटला असेल, तेवढ्यात शकीला अल्लाउद्दीन ही अवघ्या नऊ वर्षांची मुलगी अशाच पध्दतीने गायब झाली. तीसुद्धा सरपण आणायला म्हणून बाहेर पडली होती, ती परतलीच नाही. गावकऱ्यांनी शोधाशोध करता तिचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरच्या एका शेतात आढळला. शकिलाच्या शरिरावरही गयाबाईसारख्या तशाच जखमा होत्या. शरीराची विटंबना झाल्याचाही संशय होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आणखी एक खून झाला, पण तो एका महिेलेचा. यावेळी पस्तीस वर्षांची सुगंधा सुंदऱ्या मांग ही पारधी वाड्याजवळ राहणारी महिला मृत्युमुखी पडली होती. ती वेताच्या टोपल्या विणून विकत असे. त्यासाठी बांबू तोडायच्या कामासाठी म्हणून ती शिंदीच्या बनात गेली असतानाच तिच्यावर हल्ला झाला. बांबू कापण्याच्या तिच्याच कोयत्याने तिचा जीव घेतला होता. पुढे एप्रिल महिन्यात पुन्हा दहा वर्षांची नसीमा सय्यद करीम ही एका खाटकाची मुलगी बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडली, तेही भयानक स्थितीत. शिर कापलेल्या अवस्थेतल्या या मृतदेहाची पुरती विटंबना झालेली आढळली. गुप्तांगाला जखमा होत्या. छातीचा भाग काढलेला होता. उजव्या हाताची करंगळी तोडलेली, या अशा अत्यंत क्रूर पद्धतीने या चिमुरडीचा कोणी प्राण घेतला हे कळत नव्हतं. या खुनानंतर मात्र पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. तीन अल्पवयीन मुलींचे सारख्याच पद्धतीने झालेले खून आणि सुगंधा मांगचाही झालेला खून एकाच कटाचा भाग असला पाहिजे, या दिशेने पोलिस तपास करू लागले.

चौघांना अटक..!

अखेर १८ जून १९७३ ला उत्तमराव बारहाते, रुक्मिणी भागोजी काळे, भागोजी काळे, दगडू भागोजी काळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. उत्तमराव बारहाते हे मानवतमधील बडं प्रस्थ. गडी बऱ्यपैकी रगेल आणि रंगेल होता. गावात शेती आणि मोठा व्यापार होता त्याचा. गावात मोठा वाडा होता. अशा गर्भश्रीमंत उत्तमरावचे नाव या प्रकरणात आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. रुक्मिणी भागोजी काळे ही पारधी समाजातील ती विवाहित होती. पण, नवरा तिला नांदवत नव्हता. त्यामुळे ती माहेरी परत आलेली. पारधी समाजाचे हे लोक गावापासून थोडं लांब त्यांच्या वस्तीत हातभट्टीची दारू तयार करायचे. रुक्मिणीसुद्धा याच व्यवसायात होती. रगेल आणि रंगेल उत्तमरावांच्या ती नजरेत भरली आणि त्यांनी तिच्यासाठी गावातलाच भगिरथ मारवाड्याचा वाडा विकत घेतला आणि रूक्मिणीला तिथे आणून ठेवली होती. या रूक्मिणीला मूलबाळ नव्हते. त्यामुळे ती उपास-तापास, नवस-सायास करीत होती. तशातच ती गणपत साळवे नावाच्या एका मांत्रिकाच्या नादाला लागली होती. त्यातूनच हे नरबळी प्रकरण घडले असावे, असा पोलिसांचा संशय होता.

अटकेनंतरही खूनसत्र सुरूच..!

उत्तमराव-रूक्मिणीसह चारही आरोपी अटकेत असले, तरी गुन्ह्याचा उलगडा मात्र होत नव्हता. हे चौघे अटकेत असताना मानवतमध्ये पाचव्या महिलेचा खून झाला. कलावती बोंबले या बत्तीस वर्षीय विवाहितेचा खून झाला. कलावतीला मूल-बाळ नव्हतं. खून झालेल्या स्त्रियांच्या मृतदेहांची अवस्था पाहता या हत्याकांडामागे काळी जादू, नरबळी वगैरेसारखा प्रकार असण्याचा पोलिसांचा संशय होता. त्या दृष्टीने तपास सुरू झाला. पण गूढ वाढलं, कारण आरोपी अटकेत असताना पाचवा खून झाला होता. या पाचव्या खुनाच्या पाठोपाठ पुन्हा एक दहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आणि तिचाही छिन्नविच्छिन्न अवस्थेतला मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. सहा खून झाले तरी गूढ उकललं नव्हतं. पोलिसांच्या हाती पुरावे, धागेदोरे काहीच लागत नव्हते. प्रकरण तापलं आणि थेट विधानसभेत पडसाद उमटू लागले. मुंबईहून वरिष्ठ पोलिस अधिकारी तपासाला पाठवण्यात आले.

(पूर्वार्ध)

शरद पवारांनी घेतली दखल

दरम्यान, अटकेनंतर दीड महिन्याच्या आत ३० जुलै १९७३ रोजी उत्तमरावांसह चौघांची जामिनावर सुटका झाली होती. हत्यांचं सत्र थांबलं नव्हतं. विधानसभेत त्याविषयी पडसाद उमटले. तत्कालीन गृहमंत्री शरद पवार यांनी यात लक्ष घालत मुंबईहून सीआयडी ऑफिसर रत्नाकर कुलकर्णी आणि इतर वरिष्ठ अधिकारी मानवतला पाठवले. दरम्यान, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोंडिबा रिळे नावाच्या इसमाचा खून झाला होता. मुंबईचे पोलिस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी, राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक एन. एम. वाघमारे, तसेच क्राईम ब्रँचमधीलच अधिकारी विनायक वाकटकर यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news