Jintur Tahsildar action on Illegal Sand
जिंतूर : जिंतूर तालुक्यातील करपरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ती ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात असताना दुधगाव सज्जाचे तलाठी शेख खलील यांनी कोणतीही कारवाई न करता संबंधित ट्रॅक्टर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी विविध दैनिकांत बातम्या प्रसिद्ध होताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून तहसीलदार शीतल कच्छवे यांनी ३० जानेवारी रोजी तलाठी शेख खलील यांना नोटीस बजावत तीन दिवसांच्या आत प्रत्यक्ष हजर राहून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, दुधगाव सज्जाचे तलाठी शेख खलील हे यापूर्वीही वादग्रस्त ठरले असून, २७ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर त्यांनी अडवला होता. विशेष म्हणजे, संबंधित ट्रॅक्टरच्या हेडवर बसून त्यांनी सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतर पार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर ट्रॅक्टर मालक घटनास्थळी आल्यानंतर झालेल्या संभाषणानंतर तलाठी शेख खलील ट्रॅक्टरवरून खाली उतरले व कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ट्रॅक्टर सोडून दिला.
या घटनेचे फोटो वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल प्रशासनावर दबाव वाढला. त्यानंतर तहसीलदार शीतल कच्छवे यांनी वर्तमानपत्रांतील बातम्या व ग्रामस्थांच्या निवेदनाचा संदर्भ देत तलाठी शेख खलील यांना नोटीस बजावली आहे. दिलेल्या मुदतीत खुलासा सादर न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सर्व बाबी स्पष्ट असतानाही संबंधित तलाठ्यावर केवळ नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आल्याने महसूल प्रशासन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा तहसील कार्यालय व ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
२७ जानेवारी रोजी अवैध वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या हेडवर दुधगाव सज्जाचे तलाठी शेख खलील बसलेले असल्याचे छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसून येते. मात्र, त्या दिवशी त्यांनी एकाही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व बाबी समोर असतानाही केवळ गावकऱ्यांचा रोष शांत करण्यासाठीच नोटीस देण्यात आल्याची चर्चा महसूल विभागात सुरू आहे.
दुधगाव सज्जाचे तलाठी शेख खलील यांचे वाळू माफियांशी सलोख्याचे संबंध असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. या संबंधांमुळेच त्यांनी संबंधित ट्रॅक्टरवर कारवाई न करता तो सोडून दिल्याचा आरोप होत असून, तलाठी शेख खलील यांच्या मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासल्यास संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.