Parbhani ZP Elections | चुडावा जि. प. गट विकासापासून वंचित; भाजपने ६०० किलोमीटर दूरवरून उमेदवार केला ‘आयात’

जिल्हा परिषद निवडणुकीत बाहेरील उमेदवार सक्रिय
Chudawa ZP Group
Chudawa ZP GroupPudhari
Published on
Updated on

Chudawa ZP Group

आनंद ढोणे

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील चुडावा जिल्हा परिषद गट गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच राहिल्याचे चित्र आहे. या गटातील सोळा गावांमध्ये ग्रामीण रस्ते, वीजपुरवठा, आरोग्य सेवा, कृषी, पशुसंवर्धन, नदीवरील पूल, शेतरस्ते आदी मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. मागील काही पंचवार्षिक कालावधीत निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांकडून ठोस आणि सर्वसामान्यांना दिसेल असा कोणताही विकास झाल्याचे दिसून येत नाही.

गावोगाव तसेच तालुक्याशी जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हिवरा गावाजवळील नदीवर अद्याप पूल न बांधल्यामुळे पावसाळ्यात तब्बल चार महिने वाहतूक ठप्प राहते. गटातील बहुतांश रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी जि. प. व डीपीडीसीतून निधी उपलब्ध होत असतो. मात्र तरीही अनेक ठिकाणी रस्ते नादुरुस्तच आहेत. हे रस्ते दुरुस्त करण्याकडे माजी सदस्यांनी फारसे लक्ष दिले नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. काही ठिकाणी केवळ दिखाऊ स्वरूपाची कामे करून निधी लाटल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.

Chudawa ZP Group
Railway Theft Parbhani | रेल्वेत प्रवासी दाम्पत्याची लूट : मुंबई–नांदेड एक्स्प्रेसमधील धक्कादायक घटना

याशिवाय प्राथमिक व उपआरोग्य केंद्रांतून पुरेशी आरोग्यसेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यांचा खर्च सहन करावा लागतो. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लोडशेडिंगच्या नावाखाली कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने कृषी पंप चालू शकत नाहीत. अशा असंख्य समस्यांनी चुडावा जि. प. गट ग्रासलेला असतानाही, स्थानिक पुढारी एकदा निवडून आले की पुढील पाच वर्षे सामाजिक प्रश्नांकडे पाठ फिरवतात, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

निवडणुकीच्या काळात मात्र ‘मामा, दादा, काका’ म्हणत मतदारांशी जवळीक साधली जाते आणि भुलथापा देऊन मते मिळवली जातात. निवडणूक संपल्यानंतर मात्र राजकीय पुढारी पुन्हा जुन्याच वाटेवर जातात, अशी टीका होत आहे. अशा पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे रणांगण तापले आहे. चुडावा जि. प. गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना (उबाठा) या प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित करून प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारांचे गावोगावी भेटीगाठी व दौरे सुरू झाले आहेत.

Chudawa ZP Group
Parbhani Crime | जबरदस्तीने काम : तेलंगणातील २९ कामगार, ७ लहान मुलांची सुटका; चौघांविरुद्ध गुन्हा

मात्र, या निवडणुकीत स्थानिक उमेदवारांना डावलून बाहेरील उमेदवार लादल्याचा आरोप होत आहे. भाजपने सुमारे ६०० किलोमीटर दूरवरून उमेदवार ‘आयात’ केल्याचे बोलले जात असून, उबाठा गटानेही स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरील व्यक्तीला संधी दिल्याचे चित्र आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ‘पैसेवाला’ उमेदवार हवा म्हणूनच हे बाहेरील पार्सल आणले गेल्याची चर्चा जनतेत रंगली आहे. मात्र अशा उमेदवारांना मतदार स्वीकारतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या बाहेरील उमेदवारांचा मतदारसंघात फारसा परिचय नसल्यामुळे त्यांची संपूर्ण मदार स्थानिक पुढारी व कार्यकर्त्यांवरच आहे. हे कार्यकर्ते उमेदवारांसाठी जीव तोडून प्रचार करताना दिसत असून, ‘एकदा संधी द्या, सर्वांगीण विकास करू’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. एवढ्यावरही मतदारांचे समाधान झाले नाही तर येत्या काही दिवसांत पैशांचा वापर करून मतदारांना भुलवण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.

Chudawa ZP Group
ZP Election Parbhani | 'राष्ट्रवादीने डावलले, भाजपने स्वीकारले'; गौर गटातील क-हाळे पाटलांची कोलांट उडी

सरतेशेवटी पैशांचा महापूर सोडून कसेही करून निवडणूक जिंकायची आणि गुलाल आपल्यालाच लागावा, अशी तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक जिंकल्यानंतर विकासाची पर्वा नाही, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. त्यामुळे विकासाऐवजी राजकारणालाच धंद्याचे स्वरूप आले असल्याची भावना जनतेत बळावत आहे. बाहेरील उमेदवार स्थानिक नसल्याने त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आली असून, त्यामुळे या निवडणुकीत मोठी पंचाईत निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news