

जिंतूर : राज्यातील सर्वसामान्य भाविकांना सवलतीच्या दरात, सुरक्षित व सोयीस्कर प्रवासातून धार्मिक स्थळांचे दर्शन घडावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ‘एसटी संगे तीर्थाटन’ ही विशेष योजना सुरू केली आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील जिंतूर आगारातूनही नियोजन करण्यात आले आहे. भाविकांकडून मागणी प्राप्त होताच जिंतूर आगारातून बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण आणि बस स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे यांनी दिली.
ही योजना सर्वसामान्य भाविकांसाठी सवलतीच्या दरात तसेच प्रवासातील सुरक्षितता लक्षात घेऊन राबविण्यात येत आहे. जिंतूर तालुक्यातील जास्तीत जास्त भाविकांनी या उत्कृष्ट तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांची मागणी असल्यास प्रत्येक आगारातून किमान पाच बसेस या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘स्वस्त, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास’ या ब्रीदवाक्यावर आधारित ही योजना असून, खाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत कमी दरात आणि अधिक सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासगी वाहतुकीत दर अधिक असतात तसेच सुरक्षिततेचा अभाव जाणवतो. या सर्व बाबींचा विचार करून एसटी महामंडळाने ही तीर्थाटन योजना सवलतीच्या दरात अमलात आणली असून, यामुळे भाविकांना राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे.
शहर किंवा ग्रामीण भागातून किमान ४० प्रवाशांचा गट तीर्थाटन योजनेसाठी तयार झाल्यास जिंतूर आगारातून तात्काळ बस उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी दिली. सध्या या योजनेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून, प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेसाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील नवीन, सुरक्षित आणि आरामदायी बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, सुरक्षित प्रवासावर विशेष भर देण्यात आला आहे.
अमृत महोत्सव योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येईल. याशिवाय इतर सामाजिक सवलतीही योजनेत जशाच्या तशा लागू राहणार आहेत. तीर्थाटन योजनेअंतर्गत बस उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधित आगार प्रमुखांकडे मागणी करता येईल, असेही सांगण्यात आले आहे.
‘एसटी संगे तीर्थाटन’ योजना २३ जानेवारी २०२६ पासून राज्यातील २५१ आगारांत एकाच वेळी राबविण्यात येत असून, जिंतूर आगाराचाही त्यात समावेश आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान पाच बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने, तीर्थक्षेत्रांचे दर्शन आता सवलतीच्या दरात आणि अधिक सोयीस्कर होणार आहे.