Pudhari
परभणी

Parbhani Banjara Protest | बंजारा समाजाचे आंदोलन पेटले; जिंतूरमध्ये चोहोबाजूंनी रास्ता रोको

एसटी प्रवर्गात आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा बांधव आक्रमक; वाहतूक व एसटी सेवा विस्कळीत, व्यापारी-नागरिकांची धांदल

पुढारी वृत्तसेवा

Jintur Banjara Community Protest

जिंतूर : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिंतूर शहरात सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी (दि.१२) उग्र स्वरूप प्राप्त झाले. आंदोलनकर्त्यांनी शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये अचानक रास्ता रोको केल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. एसटीसह अन्य वाहतूक सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. ऐन सणासुदीच्या काळात आंदोलन झाल्याने व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांचीही मोठी धांदल उडाली.

बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विनोद आडे हे तरुण गेल्या आठ दिवसांपासून उपोषण करत आहेत. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असून, शुगर आणि रक्तदाबाच्या पातळीत चढ-उतार होत असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून या आंदोलनाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत समाजबांधवांमध्ये संताप वाढत होता.

बंजारा समाजाने १२ सप्टेंबर रोजी शांततामय रास्ता रोको आंदोलन करण्याचा लेखी इशारा प्रशासनाला दिला होता. या निवेदनात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण लागू करावे, आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच त्यांच्या कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.

जिंतूर तालुक्यात शहरी तसेच ग्रामीण भागात बंजारा समाजाची मोठी लोकसंख्या आहे. शनिवारी झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचा आरोप

बंजारा समाजाने पूर्वसूचना देऊनही रास्ता रोको आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक, बलसा फाटा, छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह शहराच्या विविध दिशांना रास्ता रोको करण्यात आला.

आंदोलनासाठी जागा निश्चित करण्यावरून तहसीलदार कच्छवे आणि बंजारा समाजाच्या शिष्टमंडळात वाद झाल्याचे समजते. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडून आंदोलनासाठी वेगवेगळ्या जागा निश्चित केल्या जात असल्याने आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव निर्माण झाल्याचे चित्र होते. परिणामी, दोन्ही बाजूंमधील दुरावा वाढत गेला आणि शनिवारी आंदोलनाने उग्र रूप धारण केले.

रास्ता रोकोमुळे शहरातील एसटी वाहतूक तसेच खासगी वाहतूक विस्कळीत झाली. अनेक प्रवासी रस्त्यातच अडकून पडले. सणासुदीच्या काळात बाजारपेठेतही नागरिकांची मोठी गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी दुकानांवर दगडफेक झाल्याचे प्रकार घडल्याचेही समजते. त्यामुळे व्यापारी वर्गातही चिंता निर्माण झाली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT