Godavari river electric motor theft in Purna
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील कावलगाववाडी शिवारात गोदावरी नदीवर बागायती पिकांच्या सिंचनासाठी बसवण्यात आलेल्या विद्युत मोटारींच्या केबल वायर व स्टार्टरची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याची घटना सोमवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली. या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याने संबंधित शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
कावलगाववाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस, केळी, हळद, कापूस व इतर बागायती पिकांसाठी गोदावरी नदीवर विद्युत मोटारी बसवून पाइपलाइनद्वारे सिंचन व्यवस्था उभारली आहे. मात्र, अज्ञात चोरट्यांच्या टोळीने मध्यरात्री कटर मशीनच्या सहाय्याने मोटारींच्या केबल वायर कापून नेल्या तसेच स्टार्टरही चोरून नेल्याचे निदर्शनास आले. सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना ही चोरी आढळून आली.
या चोरीबाबत चुडावा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी दहा दिवसांपूर्वी अजदापूर परिसरातही पूर्णा नदीवरील विद्युत मोटारींच्या केबल वायर चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्या प्रकरणातील चोरट्यांचा अद्याप तपास लागलेला नसल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कावलगाववाडीतील ही दुसरी मोठी घटना समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकारावरून विद्युत मोटारींचे केबल, स्टार्टर व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणारी संघटित टोळी सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, वारंवार घटना घडूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही, पोलीस केवळ चौकशी करून ‘तपास सुरू आहे, असे सांगतात, पण चोरटे पकडले जात नाहीत, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.
या चोरीत अजदापूर व कावलगाववाडी येथील लहू शेळके, भुजंग राहटकर, डॉ. लक्ष्मण शेळके, विश्वनाथ शेळके, किशनराव हुलसुरे, प्रभाकर डाके, मंगेश गोविंदपुरे, गंगाधर गोविंदपुरे, मारोती शेळके, माधवराव हिंगमिरे, शंकर हिंगमिरे यांच्यासह सुमारे ७५ ते ८० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींचे केबल वायर व स्टार्टर चोरीस गेले आहेत. चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अन्यथा बागायती पिकांचे सिंचन करणे अशक्य होईल, अशी तीव्र मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.