

Purna Taluka Illegal Soil Transport
पूर्णा: जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मेसर्स मोंटेकार्लो लिमिटेड कंपनीने पूर्णा तालुक्यात मनमानीचा कळस गाठला आहे. कंपनीचे प्रतिनिधी रामगोपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली, गौण खनिजाचे उत्खनन नियमबाह्य पद्धतीने सुरू असून, पर्यावरणास धोकादायक कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
संदलापूर (पूर्णा) आणि उखळद (परभणी) शिवारात येणाऱ्या पूर्णा नदीपात्रात कंपनीने कोणतीही परवानगी न घेता, अंदाजे २० फूट रुंदीचा आणि १० फूट उंचीचा नळकांडी पूल (Culvert Bridge) उभारला आहे. यासाठी १५ नळ्या बसवून त्यावर मातीचा भराव टाकण्यात आला आहे.
या अनधिकृत पुलावरून उखळद शिवारातील गट क्र. ४९ मधील नदीकाठची सनवट माती (सनवट माती) जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदून तिची हायवा टिप्परद्वारे वाहतूक केली जात आहे. दिवसरात्र चालणारी ही माती समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरली जात आहे.
पूर्णा नदी ही सार्वजनिक जलवाहिनी असल्याने तिच्या नैसर्गिक प्रवाहात अशा प्रकारे पूल उभारणे हे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणारे कृत्य आहे. यामुळे पूर, पाण्याचे प्रदूषण किंवा पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे काम सुरू आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत, उपविभागीय अधिकारी, परभणी यांनी ५ डिसेंबर रोजी तहसीलदारामार्फत मोंटेकार्लो कंपनीचे प्रतिनिधी राणा यांना खुलासा नोटीस बजावली आहे.
"पुलाच्या बांधकामाच्या वैधतेबाबत दोन दिवसांच्या आत खुलासा सादर करावा. परवानगी नसल्यास, विनाविलंब हा अडथळा (पूल) दूर करावा."
नोटीस देऊनही काम सुरूच: विशेष म्हणजे, ८ डिसेंबरपर्यंत ही नोटीस बजावूनही कंपनीने हा अनधिकृत पूल काढला नाही, उलट नदीकाठी जेसीबीने मातीचे उत्खनन आणि टिप्परद्वारे वाहतूक करण्याचे काम सुरूच ठेवले.
मोंटेकार्लो कंपनी फक्त अवैध गौण खनिज उत्खननच करत नाहीये, तर त्यांचा संपूर्ण कारभार मनमानीने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. कंपनीचे कामगार शेतकऱ्यांची उभी पिके तुडवत आहेत. निर्धारित रस्ते गायब: समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेल्या आठ ठिकाणी रस्ते तयार न करता, ती जागा खोदून घेण्यात आली आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
देवस्थान जमीन हडपण्याचा प्रयत्न: गौर शिवारातील महादलिंग स्वामी देवस्थानची १० एकर जमीन खोदण्यात आली असून, तिथे मोठी खदान (उत्खनन) तयार करण्यात आली आहे. या जमिनीवर सरकारी नाव लावून फेरफार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप देवस्थानचे पुजारी आणि ग्रामस्थ करत आहेत.
देवस्थानची जमीन हडपण्याचा हा 'अफलातून प्रयोग' हाणून पाडण्यासाठी लवकरच जन आंदोलन छेडण्यात येणार असून, याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला जाणार असल्याचे देवस्थानचे महाराज आणि गौर ग्रामस्थांनी सांगितले आहे.