GNM Question Paper Leak pudhari photo
परभणी

GNM Question Paper Leak : जीएनएम परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी उच्‍चस्‍तरीय चौकशी करा

व्‍हाॅट्सॲपवर प्रसारित झाल्‍याने खळबळ; अभाविपचे जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन, पुनर्परीक्षेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जीएनएम प्रथम वर्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हाॅट्सॲपद्वारे प्रसारितचा गंभीर प्रकार समोर आले. इंदिरा नर्सिंग महाविद्यालय परीक्षा केंद्रावर प्रकार घीला असून, याची स्वतंत्र, उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगरने केली. यासंदर्भात पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत दोषींचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली.

जीएनएम प्रथम वर्षाची परीक्षा इंदिरा नर्सिंग महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सुरू असताना प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढले व त्यानंतर ते व्हाॅट्सॲपद्वारे इतर व्यक्ती अथवा विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारितचा प्रकार समोर आला. परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर गेल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

त्यामुळे प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर पडली, ती कोणी छायाचित्रित केली आणि त्यानंतर ती कोणाकोणापर्यंत पोहोचली, याचा तपास महत्त्वाचा आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका ही अत्यंत गोपनीय बाब असते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आणि सुरू असताना प्रश्नपत्रिका सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित केंद्र प्रशासनाची असते. अशा परिस्थितीत प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून त्याचे डिजिटल माध्यमातून प्रसारण होणे ही परीक्षा प्रक्रियेतील गंभीर त्रुटी असल्याचे म्हटले. यामुळे नियमांचे पालन करून अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून, त्यांना मिळणार्‍या समान संधीवरही परिणाम होऊ शकतो.

परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. त्यामुळे परीक्षा केंद्रातील संबंधित कालावधीचे सीसीटीव्ही फुटेज जतन करावे. तसेच परीक्षा कक्षातील उपस्थितीपत्रक, प्रश्नपत्रिका वितरणाची नोंद, प्रश्नपत्रिका ठेवण्याची व्यवस्था, संबंधित पंचनामा व अन्य प्रशासकीय दस्तऐवजही तपास यंत्रणेने ताब्यात घेत सुरक्षित ठेवावे, अशी मागणी केली. प्रश्नपत्रिका केंद्रात आल्यानंतर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत कोणकोणत्या व्यक्तींच्या ताब्यात होती, प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी कोणती सुरक्षा व्यवस्था होती, तिचे सील व वितरण प्रक्रिया नियमानुसार झाली का, पर्यवेक्षक व संबंधित कर्मचार्‍यांनी कर्तव्य बजावताना कोणती काळजी घेतली, याचीही चौकशीची मागणी केली.

प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता, परीक्षा केंद्रावर नियुक्त पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख व इतर कर्मचार्‍यांची नियुक्ती प्रक्रिया, प्रश्नपत्रिका साठवणूक व वितरण व्यवस्था तसेच परीक्षा केंद्रातील सुरक्षा उपाययोजनांची स्वतंत्र तपासणी करावी, असे म्हटले. चौकशीत कोणाचीही निष्काळजीपणा किंवा नियमभंगाची भूमिका आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे यांनी जीएनएम प्रथम वर्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिका व्हाट्सअपद्वारे प्रसारितचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. प्रश्नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी शोधून काढणे गरजेचे आहे. दोषी व्यक्तींवर कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर कठोर कारवाई करावी असे म्हटले.

महानगर मंत्री गायत्री लाड यांनी प्रश्नपत्रिका फुटणे म्हणजे केवळ परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार नाही, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित पेपरबाबत तातडीने निर्णय घेऊन आवश्यक असल्यास सर्व विद्यार्थ्यांची निष्पक्ष पुनर्परीक्षा घेण्यात यावी असे सांगितले. यावेळी देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, महानगर मंत्री गायत्री लाड, जिल्हा संयोजक दर्शन देशमुख, महेश बडवे, हरीश मोरे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रश्नपत्रिका फुटीची साखळी शोधा

प्रकरणाची केवळ प्राथमिक चौकशी न करता स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत तपास करावा, अशी मागणी अभाविपने केली. प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र नेमके कोणत्या वेळी काढले, त्यावेळी परीक्षा कक्षात कोण उपस्थित होते, प्रश्नपत्रिका सर्वप्रथम कोणाकडे पोहोचली आणि तेथून कोणत्या क्रमांकांवर अथवा व्हाॅट्सॲप गटांत तिचे प्रसारण झाले, याची चौकशी करावी. यासाठी सायबर फॉरेन्सिक तपास करून डिजिटल पुरावे संकलित करावेत, अशी मागणीही केली. मोबाईल फोन, व्हाॅट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड, डिजिटल फाइल्स व इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने सुरक्षित करून त्यांची तपासणी करावी, असे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT