

जयपाल ठाकूर
औसा : औसा तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने ९६ हजार हेक्टरवरील खरीप पिके अक्षरशः शेवटच्या घटका मोजत आहेत. गेल्या तीन महिन्यांत तालुक्यातील आठही महसूल मंडळांत जेमतेम सरासरी १८ दिवस पाऊस झाला असून, तोही अत्यल्प प्रमाणात झाला आहे. गेल्या सुमारे २५ दिवसांपासून पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यातच कडक उन्हाचा तडाखा सुरू असल्याने जमिनीतील ओलावा संपला असून पिके पिवळी पडून माना टाकू लागली आहेत.
औसा तालुक्यात यंदा सुमारे ६५ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सध्या सोयाबीनला फुले व शेंगा धरण्याचा अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू आहे. याच निर्णायक टप्प्यावर पाऊस गायब झाल्याने फुलोऱ्यात आलेले पीक उन्हाच्या तीव्रतेने करपण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांसमोर सुकलेल्या पिकावर नांगर फिरवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.तूर १८ हजार ३४०, मूग २ हजार ८७४, उडीद २ हजार ९९२, खरीप ज्वारी ५ हजार ३५४ आणि मका १ हजार १२९ हेक्टरवर पेरला आहे. मात्र, पावसाअभावी या सर्वच पिकांवर संकटाचे सावट आहे.मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या लांबल्या.
अखेर कर्ज काढून, उसनवारी करून आणि हातातील पै-पै जमा करून शेतकऱ्यांनी तीन टप्प्यांत पेरण्या केल्या. सुरुवातीला झालेल्या एक-दोन समाधानकारक सरींमुळे पिकांची उगवण चांगली झाली आणि यंदाचा हंगाम हाताशी येईल, अशी आशा निर्माण झाली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
पिके वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत आहेत. मात्र, सिंचनाच्या सुविधा मर्यादित असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला हा पर्याय उपलब्ध नाही. सोयाबीनला शेंगा भरण्याच्या काळात आवश्यक असलेला नैसर्गिक पाऊसच गायब झाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे.
कर्जफेडीपासून मुलांच्या शिक्षणापर्यंत चिंता
सोयाबीन हे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे. हे पीक हातचे गेले तर संपूर्ण आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, पुढील वर्षाचा संसार कसा चालवायचा, मुलांचे शिक्षण व लग्नकार्य कसे करायचे, दैनंदिन गरजा कशा भागवायच्या, या प्रश्नांनी शेतकरी हवालदिल झाला आहे.पाऊस आणखी लांबला तर केवळ खरीप हंगामाचे नुकसान होणार नाही, तर हजारो शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक घडीवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तालुक्यातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तालुक्याची वाटचाल कोरड्या दुष्काळाकडे?
जूनमध्ये आठही महसूल मंडळांत सरासरी पाच ते सहा दिवस, जुलैमध्ये दहा दिवस, तर ऑगस्टमध्ये अवघे तीन दिवस पाऊस झाला. जूनमध्ये भादा मंडळात सर्वाधिक १०७.५ मि.मी., तर उजनी मंडळात ५३.९ मि.मी. पाऊस झाला. जुलैमध्ये औसा मंडळात १०७ मि.मी., तर उजनी मंडळात केवळ ५४.९७ मि.मी. पाऊस झाला. ऑगस्टमध्ये भादा मंडळात १५.४७ मि.मी., तर बेलकुंड मंडळात अवघा ७ मि.मी. पाऊस नोंदला गेला.
यंदा तालुक्यात १५ ऑगस्टपर्यंत केवळ १९३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३१३ मि.मी. पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा तब्बल १२० मि.मी. पावसाची घट झाली आहे. मोठा पाऊसच न झाल्याने नदी-नाले कोरडे असून लघू व मध्यम प्रकल्पांमध्येही नवीन जलसाठा झालेला नाही. तालुक्यातील ११ लघू प्रकल्पांमध्ये सध्या केवळ मृतसाठा शिल्लक असून काही तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.