परभणी : शहरातील खंडोबा कॉर्नर परिसरात सुरू असलेल्या गांजाच्या अवैध वाहतूक व विक्रीच्या व्यवहारावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी १ किलो १०० ग्रॅम गांजा, बॅग आणि गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ऑटो, असा एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तेलंगणातील निजामाबाद येथील दोघांसह ऑटोचालक अशा तिघांचा सहभाग समोर आला आहे.
परभणी शहरातील खंडोबा कॉर्नर परिसरात गांजाची अवैध वाहतूक आणि विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने खंडोबा कॉर्नर परिसरात सापळा रचला.
पोलिसांचे पथक संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असताना गांजाची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १.१० किलो गांजा व त्याची बॅग जप्त करण्यात आली. या गांजाची अंदाजे किंमत ५० हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एमएच-२२-एपी-०८६९ क्रमांकाचा ऑटो रिक्षाही पोलिसांनी जप्त केला.
या ऑटोची अंदाजे किंमत ७५ हजार रुपये आहे. गांजा आणि ऑटो असा एकूण १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणात नविद नवाब पठाण (वय २२, रा. निजामाबाद, तेलंगणा), सुलतान मिर्झा (वय ४०, रा. निजामाबाद, तेलंगणा) आणि ऑटोचालक शेख शिराज शेख खाजा यांचा सहभाग समोर आला आहे. नविद नवाब पठाण हा गांजाचा कॅरिअर असल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गांजा तस्करीचे परभणी-तेलंगणा कनेक्शन तपासाच्या केंद्रस्थानी आले आहे.
या प्रकरणी नानालपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला गांजा नेमका कोठून आणण्यात आला होता, त्याचा पुरवठादार कोण आहे, परभणीपर्यंत तो कोणत्या मार्गाने आणण्यात आला आणि शहरात त्याची विक्री कोणाकडे केली जाणार होती, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. परभणी शहरात अमली पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू असून, खंडोबा कॉर्नरवरील या कारवाईमुळे गांजा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाच्या पुढील तपासातून अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायातील आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात पोउपनि. चंदन परिहार, पोउपनि. गणेश सवंडकर, श्रेणी पोउपनि. मधुकर चट्टे, सपोउपनि. सुग्रीव केंद्रे, सपोउपनि. निलेश भुजबळ, पोह. रणजीत आगळे, सूर्यकांत फड, लटपटे, माणिक डुकरे, फड, महेश पांगरकर, गिते, कागणे, प्रमोद पुरी आदींचा सहभाग होता. या प्रकरणी फिर्याद पोह. रणजीत आगळे यांनी दिली.
तस्करीची साखळी शोधण्याचे आव्हान
या कारवाईत गांजा वाहून नेणारे संशयित पोलिसांच्या हाती लागले असले तरी या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण, गांजाचा मूळ स्रोत कुठे आहे आणि या व्यवहारात आणखी किती जण सहभागी आहेत, याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांकडून संशयितांची चौकशी करून मूळ पुरवठादारापासून स्थानिक विक्रेत्यापर्यंतची संपूर्ण साखळी शोधण्याचे काम सुरू आहे.