Ausa rainfall shortage : औसा तालुक्यात पावसाच्या खंडाने सोयाबीन, उडीद संकटात

उजनी परिसरात ५५ दिवस कोरडे, उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती
Ausa rainfall shortage
Ausa rainfall shortagepudhari photo
Published on
Updated on

औसा : चालू खरीप हंगामात पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे औसा तालुक्यातील सोयाबीन, तूर, उडीद यासह अन्य पिके सुकू लागली आहेत. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकांची पाने व फुले गळून पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट उजनी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.

तहसीलदार घनश्याम अडसूळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय हाके, ग्राम महसूल अधिकारी शिवकुमार कस्तुरे आणि सहायक कृषी अधिकारी प्रवीण बनकर यांनी उजनी येथील शेतकरी मैनुद्दीन शेरीकर यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती, पावसाचा खंड आणि निर्माण झालेल्या अडचणींची माहिती घेतली.

Ausa rainfall shortage
SC sub classification : उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न

१३ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे. उजनी परिसरात तब्बल ५५ दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पिकाला पाण्याचा तीव्र ताण बसला आहे. शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत असलेल्या पिकांची पाने व फुले गळून पडत असून काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भावही दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

तहसीलदार अडसूळ यांनी शेतकऱ्यांना धीर देत पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्याची ग्वाही दिली. तालुका कृषी अधिकारी हाके यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांना संरक्षित सिंचन देण्याचे आवाहन केले. उर्वरित पिके वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी सांगितले.

Ausa rainfall shortage
Jalna Ganeshotsav 2026 : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण; बाप्पांचे थाटात आगमन!

प्रशासनाने थेट बांधावर येऊन परिस्थितीची पाहणी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे हतबल झालेला शेतकरी आता शासनाकडून आर्थिक मदत आणि पीकविमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news