Parbhani Fulkalas Rasta Roko Pudhari
परभणी

Parbhani Student Protest | ‘आम्हाला पादचारी पूल हवा: जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडायचा नाही’; फुलकळसच्या विद्यार्थ्यांचा आक्रोश

४८१ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य महामार्ग ६१ वर रास्ता रोको

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Fulkalas Rasta Roko

ताडकळस : शाळेत जाण्यासाठी दररोज राज्य महामार्ग क्रमांक ६१ ओलांडावा लागत असल्याने फुलकळस येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पादचारी पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि. ८) महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या संतप्त सवालांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले.

फुलकळस येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतचे ४८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा महामार्गाच्या एका बाजूला असल्याने विद्यार्थ्यांना दररोज रस्ता ओलांडावा लागतो. या मार्गावर नांदेड, पाथरी, माजलगाव, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याकडे जाणारी मोठी वाहतूक सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

“आम्ही शिक्षणासाठी शाळेत येतो; मात्र रस्ता ओलांडताना प्रत्येक वेळी भीती वाटते. आमच्यासाठी पादचारी पूल उभारावा,” अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. पालकांनीही प्रशासनाने दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी भूमिका घेतली.

पादचारी पुलासाठी यापूर्वी संबंधित विभागाकडे निवेदने देण्यात आली होती. खासदार फौजिया खान यांनीही हा प्रश्न मांडला होता. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

गतिरोधक बसविण्याचे निर्देश

आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री बोर्डीकर यांनी पुढील बैठकीत फुलकळसच्या पादचारी पुलाचा प्रश्न पहिला विषय म्हणून घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनीही तहसीलदार आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना आंदोलनस्थळी पाठवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने गतिरोधक बसविण्याचे निर्देश दिले.

गतिरोधक हा तात्पुरता उपाय असून, पादचारी पूल हाच कायमस्वरूपी तोडगा असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. आंदोलनावेळी ताडकळस पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. ग्रामस्थ, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष पादचारी पुलाच्या कामाला कधी सुरुवात होते, याकडे ४८१ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT