मानवत - मानवत तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, मूग यांसह खरीप पिके मोठ्या प्रमाणात करपून गेले आहे. मानवत तालुका तत्काळ कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तृतीयपंथीयांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे.
किन्नर समाजातील गौरी देवकर, किरण देवकर, चांदणी देवकर, अश्विनी देवकर, शबनम देवकर यांनी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. निवेदनात पावसाअभावी शेतातील पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कुटुंबाचा दैनंदिन खर्च, मुलांच्या शाळेची फी आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्यांचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मागणीची तातडीने दखल न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात किन्नर समाजाने पुढाकार घेत शासनाचे लक्ष वेधल्याने परिसरात चर्चा होत आहे.
अत्यल्प पावसाने दुष्काळाचे सावट
मानवत तालुक्यात यावर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये फक्त दोन ते तीन दिवस पाऊस पडल्याने गंभीर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शेतातील उभी पिके करपून गेली असून विहिरींनी तळ गाठला असून पाण्याचे बोअर आटत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक परेशान झाले आहेत. कोरडा दुष्काळ जाहीर करून शासकीय मदत देण्याची मागणी आता तृतीयपंथीयांनी केली आहे.