परभणी: खरीप हंगाम-2025 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांचा विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेचे आ.डॉ. राहुल पाटील यांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देत, या कालावधीत पीकविम्याची रक्कम वितरित न झाल्यास जिल्हाभरात तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
बुधवारी (दि.6) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना घेरावो घालण्यात आला. याप्रसंगी बोलताना आ.डॉ. पाटील यांनी राज्यातील सत्तारुढ महायुती सरकारवर कडाडून ताशेरे ओढले. जिल्ह्यात विजेचा लंपडाव सुरू असून काही-काही गावात 10-10 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत आहे.
शेतकऱ्यांना कॅनमध्ये ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळणे मुष्कील झाले आहे. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरसह विविध योजनेचे अनुदान रखडले असून शेतकऱ्यांनी मरायचे का? आत्महत्या करायच्या का ? असा संतप्त सवाल आ.डॉ. राहुल पाटील यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी या नात्याने आपण 15 दिवसांच्या आत पिकविमा देण्यासंदर्भात राज्य शासनाकडे विनंती करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी कोरड्या पिक कापणी प्रयोगाचा अहवाल तातडीने विमा कंपनीकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा काढला असतानाही तांत्रिक कारणांवरून विमा कंपनीकडून भरपाई रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पिक कापणी प्रयोगाच्या अहवालात ओल्या व कोरड्या पिकांच्या बाबतीत निर्माण झालेल्या तांत्रिक मुद्द्यांचा गैरफायदा घेतल्यामुळे परभणी जिल्ह्याचा विमा मंजूर करण्यात आलेला नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
त्यामुळे लाखो शेतकरी भरपाईपासून वंचित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. 15 दिवसांच्या आत पिकविमा न मिळाल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिला आहे.
ठिय्या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, रवींद्र धर्मे, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महापौर सय्यद इकबाल, महिला आघाडी जिल्हा संघटक अंबिका डहाळे, कल्याणराव रेंगे-पाटील, संजय गाडगे, नंदू अवचार, गणेश घाटगे, अरविंद देशमुख, रवींद्र देशमुख, अनिल डहाळे, डॉ. अनिल कांबळे, बाळासाहेब राखे व शेकडो शिवसैनिकांनी सहभाग नोंदविला.