

Shiv Sena's road blockade protest in Sillod
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करावा व शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या ग्रेडर व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या व इतर मागण्यांसाठी राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने सिल्लोड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी बारा वाजता रखरखत्या उन्हात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी कापूस पेटवून प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध व्यक्त केला. सीसीआयची कापूस खरेदी सुरू झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना अडवणाऱ्या ग्रेडरवर कारवाई करा, दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा करा अशा ठणकावून सांगणाऱ्या मागण्यांनी परिसर दणाणून गेला. उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले व मागण्या शासनाकडे पाठवून पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार शेख हारून व काशिनाथ ताठे उपस्थित होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
महामार्ग ठप्प
रास्ता रोकोमुळे जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या, मात्र कोणत्याही वाहनचालकाला किंवा नागरिकांना त्रास होऊ न देता शिस्तबद्ध आंदोलन झाले.
रुग्णवाहिकेला तत्काळ मार्ग
आंदोलन सुरू असतानाच रुग्णवाहिका दिसताच आमदार अब्दुल सत्तार यांनी तत्काळ रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. कोणताही अडथळा न आणता रुग्णवाहिकेला मार्ग देण्यात आला.
आमदार सत्तारांचा इशारा
आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, लोकशाहीत आंदोलन हा अधिकार आहे; पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे हे पाप आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे राजकारण म्हणजे त्यांच्या आर्थिक उन्नतीवर घाला आहे. हा रास्ता रोको कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे.
तातडीने सीसीआय खरेदी केंद्र सहकारी जिनिंगमध्ये सुरू न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा दिला. या रास्ता रोको आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, शहरप्रमुख मनोज झवर, नॅशनल सूतगिरणीचे चेअरमन व नूतन नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे, उपसभापती संदीप पा. राऊत, दुर्गाताई पवार, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, नगरसेवक डॉ. फिरोज खान, किशोर अग्रवाल, आसिफ बागवान, सुधाकर पाटील, राऊत बागवान, नरेंद्र बापू पाटील, जुम्माखा पठाण, शेख इमरान गुड्डू, देविदास लोखंडे, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, विठ्ठल सपकाळ, वा.स. संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, शेख जावेद, प्रताप प्रसाद, देविदास पालोदकर, चेअरमन गणेश गरुड, व्हाईस चेअरमन अनिस पठाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कापसाला दर नाही, शेतकरी अडचणीत
सीसीआय केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकावा लागत असून योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.