Parbhani news  
परभणी

Parbhani|दूषित पाण्याच्या प्रश्नाची घेतली दखल; तातडीने कार्यवाही करत चारठाण्यात पाणीपुरवठा सुरळीत

Charthana Water Supply Restored- चारठाण्यात ग्रामपंचायतीची तातडीने कार्यवाही; टाकी स्वच्छ करून नळाचा पाणीपुरवठा सुरळीत, 'दैनिक पुढारी'च्या वृत्ताची दखल

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : चारठाणा येथील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीने नळाचा पाणीपुरवठा बंद केल्याची बातमी दैनिक ‘पुढारी’च्या २४ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांगणे आणि नव्याने रुजू झालेले प्रशासक एस. व्ही. ढोणे यांनी संबंधित यंत्रणेला सूचना देत दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.

नांदेड-संभाजीनगर चारठाणा येथील चौथ्या पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या बांधकामामुळे पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणात हिरवट रंगाचे पाणी साचले होते. या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने ते विहिरीत मिसळून पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दैनिक ‘पुढारी’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने संबंधित कंत्राटदाराला सूचना देऊन साचलेल्या पाण्याचा जेसीबीच्या साहाय्याने उपसा करून घेतला. तसेच विहिरीलगतचा परिसर स्वच्छ करण्यात आला. विहिरीतून गावातील पाण्याच्या टाकीत पाणीपुरवठा केला जात असल्याने टाकीत साचलेले हिरवट पाणी काढून संपूर्ण टाकी स्वच्छ धुऊन निर्जंतुक करण्यात आली.

त्यानंतर रविवारी, २७ सप्टेंबर रोजी पाण्याची टाकी स्वच्छ केल्यानंतर जुन्या नळ योजनेचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. सध्या गावातील विविध प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने वॉर्डनिहाय पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने केलेल्या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. ‘पुढारी’च्या वृत्तामुळे प्रशासनाने तत्काळ दखल घेत प्रश्न मार्गी लावल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT