Charthana Additional Tehsildar Office
परभणी : जितूर तालुक्याचा वाढता प्रशासकीय व्याप, भौगोलिक विस्तार आणि महसूलविषयक कामांसाठी नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन चारठाणा येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. महसूल विभागाने मंगळवारी (दि. २२) यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यामुळे जितूर तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, चारठाणा परिसरातील नागरिकांना महसूल सेवा अधिक जवळच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
शासन निर्णयानुसार, चारठाणा अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात चारठाणा, वाघी धा. आणि बामणी या तीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. तर जितूर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जितूर, आडगाव, बोरी, दुधगाव आणि जांबंगी म्हा. या पाच महसूल मंडळांचा समावेश राहणार आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाचे कामकाज विभागले जाऊन स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
नवीन कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकार व कर्तव्ये अपर तहसीलदारांकडे सोपविली जातील. मात्र, निवडणूक, संजय गांधी निराधार योजना तसेच संपूर्ण तालुक्याशी संबंधित इतर प्रशासकीय कामकाज जितूर तहसील कार्यालयाकडेच राहणार आहे.
चारठाणा अपर तहसीलदार हे कार्यालयप्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहतील. अपर तहसीलदारांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी, तर नियंत्रक अधिकारी म्हणून परभणी जिल्हाधिकारी राहतील. अपर तहसीलदाराची नियुक्ती शासनस्तरावरून, तर अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदस्थापना जिल्हाधिकारी स्तरावर करण्यात येणार आहे.
चारठाणा परिसरातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी जितूरला जावे लागत असल्याने वेळ, प्रवासाचा खर्च आणि अंतराचा त्रास सहन करावा लागत होता. नवीन कार्यालयामुळे या भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच अनेक महसूल सेवा मिळणार आहेत.
नवीन कार्यालयासाठी सुरुवातीला तात्पुरती जागा निश्चित करून कायमस्वरूपी जागेचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन निर्णयातील आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल १५ दिवसांत शासनाला सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानंतर कार्यालय प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत शासनाकडून स्वतंत्र सूचना दिली जाणार आहे.