Parbhani News | दुष्काळाच्या यादीवरून माजी जिल्हा परिषद सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल!

भगवान सानप व राजेश फड यांच्यावर पोले यांच्या तक्रारीवरून कारवाई
Parbhani News | दुष्काळाच्या यादीवरून माजी जिल्हा परिषद सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल!
Parbhani News | दुष्काळाच्या यादीवरून माजी जिल्हा परिषद सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल!
Published on
Updated on

गंगाखेड : परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीबाबत सोशल मीडियावर कथित चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान सानप व राजेश फड यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गंगाखेड तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अकोली येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम संभाजी पोले यांनी २० सप्टेंबर रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. तक्रारीत सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीबाबत चुकीची माहिती प्रसारित करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजता फेसबुकवर राजेश फड यांच्या फेसबुक अकाउंटवर परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीसंदर्भातील एक पोस्ट प्रसारित करण्यात आली. या पोस्टमध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तालुक्याचा समावेश नसल्याचे दाखविण्यात आले होते. सदर यादी बनावट व निराधार असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.या पोस्टनंतर ती माहिती विविध व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही प्रसारित झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूदआहे.गंगाखेड तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध स्तरांतून होत असताना सोशल मीडियावर अशा प्रकारची माहिती प्रसारित करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती येण्यापूर्वीच कथित चुकीची यादी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.तसेच संबंधित पोस्टच्या माध्यमातून आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप तक्रारदाराने केला आहे.तक्रारीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

सोशल मीडिया पोस्टच्या प्रसाराशी संबंधित बाबींची चौकशी करून पोस्ट तयार करणारे, ती प्रसारित करणारे तसेच त्यास पुढे प्रसारित करणाऱ्यांची भूमिका तपासावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीची दखल घेत भगवान सानप व राजेश फड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची अधिकृतता तपासणे आवश्यक असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाच्या पोलिस तपासाकडे गंगाखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news