परभणी

Parbhani Maratha Andolan: मानवत तालुक्यातील ५४ गावांत शुक्रवारी लाक्षणिक उपोषण, चारठाणा येथे बंद

अविनाश सुतार

मानवत, चारठाणा; पुढारी वृत्तसेवा: मराठा समाजास तत्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मानवत तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. शुक्रवारी (दि. ८) तालुक्यातील एकूण ५४ गावात एकाच वेळी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. (Parbhani Maratha Andolan)

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तहसीलदार पल्लवी टेमकर यांना सोमवारी (दि. ४) निवेदन देण्यात आले. शुक्रवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४ गावातील ग्रामपंचायत किंवा मध्यवर्ती ठिकाणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी (दि.११) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर हजारोंच्या उपस्थितीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. (Parbhani Maratha Andolan)

५४ गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना दिली.

Parbhani Maratha Andolan : चारठाणा येथे कडकडीत बंद; मुस्लिम समाजाचा पाठिंबा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ चारठाणा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला मराठा समाजासोबत मुस्लिम समाजानेही प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांनी बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवून जाहीर निषेध व्यक्त केला. तलाठी आर. एन. गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, यु. टी. सातपुते, विष्णुदास गरुड, बारहत्ते, पवन राऊत, सुधाकर कुटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

यावेळी सरपंच अनिरुद्ध चव्हाण, निलेश चव्हाण, सतीश देशमुख, रुस्तुम देशमुख, किरण देशमुख, जनार्दन चव्हाण, सुनील चव्हाण, कान्हा चव्हाण, आकाश चव्हाण, नवनाथ चव्हाण, दौलत देशमुख, नवनाथ चव्हाण, केदार चव्हाण, आत्माराम मेहत्रे, वसंता निकाळजे, संदीप देशमुख, युवराज देशमुख, संतोष देशमुख, दत्तराव खाडे, सलीम उद्दीन काजी, अजगर देशमुख, सय्यद मुजीब, अहमद आबेद आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT