Bribe Case Pudhari
परभणी

Parbhani ZP Art Teacher Bribe: थकीत वेतनासाठी १ लाख ८० हजारांची लाच घेताना झेडपीत दोघे चतुर्भुज

Corruption Case: लिपिक तथा कला शिक्षक रंगेहात पकडला ; उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही घेतले ताब्यात

Anirudha Sankpal

परभणी: पुढारी वृत्तसेवा

पत्नीचे थकीत वेतन मंजूर झाल्यानंतर त्याची रक्कम अदा करण्यासाठी १५ टक्के कमिशन नावाखाली तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातील कला शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.२६) दुपारी रंगेहात पकडले. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याचेही नाव समोर आले असून, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे अतिरिक्त पदभार असलेले संदीप घोन्सीकर यांनाही एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

थकित वेतनाच्या १५ टक्के रक्कम मागितली

प्रकरणातील तक्रारदार हे ६२ वर्षीय असून, त्यांच्या पत्नीने ३० ऑक्टोबर २०२४ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या पत्नीचे एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील तब्बल १२ लाख ४६ हजार ४९८ रुपये थकीत वेतन मंजूर होते. मात्र, मंजूर वेतनाची रक्कम अदा करण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील लिपिक तथा कला शिक्षक शेख असलम शेख रज्जाक याने थकीत वेतनाच्या १५ टक्के रक्कम दिल्याशिवाय पैसे मिळणार नसल्याचे सांगत १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १७ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

मोबाईल संभाषणाद्वारे पडताळणी

तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५७ वाजण्याच्या सुमारास मोबाईलवरील संभाषणाद्वारे लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी शेख असलम याने तक्रारदाराकडे १ लाख ८० हजार रुपयांची मागणी करून ही रक्कम स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी (दि.२६) परभणी बसस्थानक परिसरातील मिलन ऑप्टिकलसमोर सापळा रचला. दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास शेख असलम याने तक्रारदाराकडून १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

शेख अस्लमचा घोन्सीकरला कॉल अन्...

लाच स्वीकारल्यानंतर शेख असलम याला एसीबीच्या कार्यालयात आणले. तेथे पंचांसमक्ष चौकशी केली असता, स्वीकारलेली लाचेची रक्कम वरिष्ठ अधिकारी डॉ.घोन्सीकर यांच्यासाठी घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पंचांसमक्ष शेख असलम याने घोन्सीकर यांना मोबाईलवर संपर्क साधून १ लाख ८० हजार रुपये स्वीकारल्याची माहिती दिली आणि ही रक्कम कुठे आणून द्यायची, अशी विचारणा केली. त्यावर घरी घेऊन येण्यास सांगितल्याचे संभाषणातून निष्पन्न झाल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद केले आहे.

या प्रकरणात शेख असलम शेख रज्जाक आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोन्सीकर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक किशोर तरोणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.

पथकात सपोउपनिरी निलपत्रेवार, पोशि बोधनकर, नागरगोजे, घुले यांचा समावेश होता. एसीबीचे नांदेड परिक्षेत्र पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली. दरम्यान, शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT