

बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील नामदेव नगर परिसरातील नेहा इकबाल पठाण (वय २४, रा. बोरी) या महिलेचा सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या कथित हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित डॉक्टरांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले.
नेहा पठाण यांना मागील दीड वर्षापासून हात-पाय सुजण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर बोरी येथील डॉ. किरण बकान यांच्या खाजगी साई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोमवारी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांचे पती इकबाल पठाण यांनी त्यांना साई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तीन इंजेक्शन दिले. प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याने त्या घरी परतल्या.
मात्र, अर्ध्या तासानंतर पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांना साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी आणखी दोन इंजेक्शन दिले. अशा प्रकारे दोन ते अडीच तासांच्या कालावधीत एकूण पाच इंजेक्शन देण्यात आल्यानंतर महिलेची प्रकृती अधिकच खालावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना परभणी येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
पती इकबाल पठाण यांनी ऑटोची व्यवस्था करून पत्नीला त्यातून नेण्यास सुरुवात केली. मात्र, हॉस्पिटलपासून काही अंतरावर जाताच नेहा या अचानक बेशुद्ध पडल्या. त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने पतीने तातडीने त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मात्र, ग्रामीण रुग्णालयात आणण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळेच नेहा पठाण यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. डॉक्टरांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची भूमिका पुढे ठरविण्यात आली.
दरम्यान, मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांभ स्वामी यांनी सांगितले. या घटनेमुळे बोरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.