Parbhani Aadya Baheti Bronze Medal
सेलू : इंग्लंडमधील शेफिल्ड येथे १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या ११ वर्षांखालील ‘जागतिक ऑलिंपिक आशेचा किरण’ टेबल टेनिस स्पर्धेत परभणीच्या आद्या महेश बाहेती हिने कांस्यपदक पटकावून महाराष्ट्रासह देशाचा गौरव वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत आद्याने एकूण १५ सामने खेळताना १३ सामन्यांत विजय मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत पाच खंडांतील विविध देशांच्या १६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इजिप्त, इंग्लंड, फिनलंड, ग्रीस, ग्वातेमाला, भारत, मलेशिया, न्यूझीलंड, पराग्वे, पेरू, रोमानिया, ट्युनिशिया, उझबेकिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. या आंतरराष्ट्रीय आव्हानात आद्याने सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदकाला गवसणी घातली.
आद्या बाहेती ही भारतीय खेल प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत परभणी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र तसेच मिशन लक्षवेध प्रतिभा विकास केंद्रात प्रशिक्षण घेते. प्रशिक्षक चेतन मुक्तावर आणि सूरज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. तिच्या या यशात अनिल बंदेल, सचिन पुरी, असद अली आणि अजय कांबळे यांचेही मार्गदर्शन लाभले.
आद्याच्या या यशाबद्दल टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुकंड, राष्ट्रीय सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे, सुयश नाटकर, रोहन ओंढेकर, परभणी जिल्हा सचिव व राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, परभणी सिटी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर, जिल्हा संघटनेचे सहसचिव ज्ञानेश्वर पंडित यांच्यासह प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले.
सरावासाठी विक्रम हातेकर, पवन कदम, पीयूष रामावत, तुषार जाधव, रोहित जोशी, साक्षी देवकाते, भक्ती मुक्तावर आणि विश्वनाथ स्वामी यांचेही सहकार्य लाभले. आद्याच्या यशामुळे परभणीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, पालकांनीही तिचे अभिनंदन केले आहे.