परभणी

Parbhani News : पांगरा-पूर्णा रस्ता बनला 'मृत्यूचा सापळा'; अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची वाताहत

दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक ठप्प होत असून, चिखलात घसरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील पांगरा ते पूर्णा या ६ किमी अंतराच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, हा रस्ता आता 'मृत्यूचा सापळा' बनला आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि समृद्धी महामार्गासाठी होणारी अवजड वाहनांची वाहतूक यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

निकृष्ट कामाचा फटका

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्णा ते हिवरा या १२ किमी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम 'आशिर्वाद कन्स्ट्रक्शन, लातूर' (गुत्तेदार देशमुख) यांना देण्यात आले होते. कामाच्या सुरुवातीला मातीमिश्रित मुरुमाचे दोन थर देण्यात आले. मात्र, चुनखडीयुक्त माती आणि निकृष्ट मुरुमामुळे पावसाळा सुरू होताच रस्त्याचे रूपांतर चिखलात होत आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक ठप्प होत असून, चिखलात घसरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

समृद्धी महामार्गाच्या वाहतुकीचा अडथळा

रस्त्याचे काम सुरू असतानाच जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) हायवा आणि टिप्परची रात्रंदिवस वाहतूक सुरू झाली. यामुळे रस्ता खचला आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम अर्धवट बंद करण्यात आले.

प्रशासकीय बैठकीचा फज्जा

या रस्त्याच्या प्रश्नावर पांगरा येथील सामाजिक कार्यकर्ते बाबाराव ढोणे यांनी आमरण उपोषण केले होते. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार प्रशांत थारकर, प्रधानमंत्री ग्रामसडकचे कार्यकारी अभियंता वाघ आणि एम.एस.आर.डी.सी.चे कार्यकारी अभियंता यांच्यात बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्री सडक योजनेच्या गुत्तेदाराने पांगरा ते हिवरा काम पूर्ण करावे आणि समृद्धी महामार्गाच्या गुत्तेदाराने पूर्णा ते पांगरा रस्त्यावर कठीण मुरुम टाकून वाहतूक सुरळीत ठेवावी; असे निर्णय झाले होते. मात्र, हे दोन्ही निर्णय कागदावरच राहिले.

दोन्ही विभागांच्या वादात सामान्य नागरिकांची तारेवरची कसरत

दोन्ही गुत्तेदारांनी प्रशासकीय आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडकच्या कार्यकारी अभियंत्यांनी समृद्धी महामार्गाच्या अभियंत्यांकडे पत्रव्यवहार करूनही त्यास 'केराची टोपली' दाखवण्यात आली आहे. खा. संजय जाधव यांनी दिलेल्या सूचनांनाही संबंधित यंत्रणा जुमानत नसल्याचे चित्र आहे. या दोन्ही विभागांच्या वादात सामान्य नागरिक आणि वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT