Nitesh Rane : पालकमंत्र्यांनी धारेवर धरताच ठेकेदार भानावर

सावंतवाडीत अखेर खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात!
Sindhudurg News
सावंतवाडी शहरातील संचयनी बिल्डिंग समोरील बु­­­­­­­­­­­­­­­­­­­जवलेले खड्डे.
Published on
Updated on

सावंतवाडी : शहरातील बहुचर्चित ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामावरून अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले. मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सज्जड दम भरल्यानंतर ठेकेदार भानावर आला असून, शहरात खोदलेले खड्डे आणि चर बुजविण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.

नागरिकांचा वाढता रोष आणि अपघात

सावंतवाडी शहरात तब्बल ५७ कोटी रुपये खर्चून नळपाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामासाठी ठेकेदाराकडून रस्त्यावर मोठे चर मारण्यात आले होते. काम झाल्यानंतर या चरांमध्ये योग्य प्रकारे खडीकरण आणि डांबरीकरण करणे आवश्यक होते, परंतु ठेकेदाराने याकडे साफ दुर्लक्ष केले. परिणामी, पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड खड्डे पडले असून रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांत अनेक नागरिक आणि वाहनधारक पडून जखमी झाले होते. यामुळे स्थानिक जनतेमध्ये प्रशासनाविरोधात आणि ठेकेदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत होता.

मंत्रालयातील बैठकीत 'राणे पॅटर्न'; गुणवत्तेच्या चौकशीचे आदेश

या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच मंत्रालयात एक तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, पीएमसीचे (Project Management Consultant) प्रतिनिधी आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी कामाच्या संथ गतीबद्दल आणि ढिसाळ कारभाराबद्दल ठेकेदाराची कडक शब्दांत कानउघाडणी केली. जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

केवळ ठेकेदाराला झापूनच राणे थांबले नाहीत, तर या संपूर्ण नळपाणी योजनेच्या कामाची गुणवत्ता (Quality Check) तपासण्याचे थेट आदेश त्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले आहेत. तसेच प्रशासनाला या प्रकरणी आवश्यक त्या सर्व कडक सूचनाही केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news