परभणी

Navratri 2023 | परभणी : भोगावची नवसाला पावणारी जगदंबा

मोहन कारंडे

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या भोगाव येथे संपूर्ण मराठवाड्यातून भाविक नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी येतात. संस्थानच्या वतीने या ९ दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते.

शहरापासून १० कि.मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात तुळजाभवानी देवीचे हेमाडपंती मंदिर आहे. भोगाव देवीची ओळख नवसाला पावणारी देवी अशी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील भाविक या ठिकाणी आपला नवस बोलण्यासाठी येतात. या देवीच्या मंदिरात सनई-चौघडा, ढोलताशांच्या निनादात आई जगदंबेचा जयघोष करीत नवरात्र उत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. नवरात्र महोत्सवात दररोज काकडा आरती, नित्य उपासना, रुद्राभिषेक, श्री सुक्त अथर्वशीर्ष सहस्त्रनाम पाठ, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या देवी संस्थानचा कारभार मोरे-देशमुख घराण्याकडे आहे. या घराण्याकडे देवीची पूजा, आरतीचा मान आहे. रविवारी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. देवीचा जागर म्हणून अष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन केले जाते. त्याच दिवशी मध्यरात्री होमहवन केले जाते. नवमीच्या दिवशी कोहळ्याची पुर्णाहूती दिली जाते. त्यानंतर काही काळ देवीचे दर्शन बंद असते. सायंकाळी देवीची पालखी निघते. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाने नवरात्र उत्सवाची सांगता होते. भाविकांची इच्छा पूर्ण करणारी अशी भोगाव देवीची ओळख आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT