MSRTC Online Pass pudhari photo
परभणी

MSRTC Online Pass : एसटीचा आवडेल तेथे कोठेही पास आता ऑनलाईन

चार ते सात दिवसांचे पास घरबसल्‍या काढता येणार; क्‍यूआर कोडद्वारेही तपासणी, प्रवाशांना सुविधा

पुढारी वृत्तसेवा

परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेला आता डिजिटल स्वरूप देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ४ व ७ दिवसांचे प्रवास पास ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी आगारात जाऊन हस्तलिखित अर्ज व पास प्रक्रियेचा आधार घेण्याची गरज राहणार नाही. एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरून प्रवाशांना ऑनलाइन पास काढता येणार आहे, अशी माहिती परभणी विभाग कार्यालयाच्‍या वतीने देण्यात आली आहे.

आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेतील पास सध्या आगार पातळीवर हस्तलिखित पद्धतीने वितरित करण्यात येत होते. मात्र, प्रवाशांना ही सुविधा अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक पद्धतीने उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्‍य परिवहन महामंडळाने ऑनलाइन पास प्रणाली सुरू केली आहे. https://npublic.msrtcors.com या एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पास काढण्यासाठी प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक ती माहिती भरायची आहे.

नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रवाशांना ४ किंवा ७ दिवसांचा आवडेल तेथे कोठेही प्रवास पास ऑनलाइन मिळणार आहे. त्यामुळे पास काढण्यासाठी आगारात रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचणार आहे. या योजनेच्या पासचे दर, अटी व शर्ती याबाबत एसटी महामंडळाने यापूर्वीच वाहतूक विभागाच्या परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसारच ऑनलाइन पद्धतीने पास वितरित केले जाणार आहेत.

८ जानेवारी रोजी अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आवडेल तेथे कोठेही प्रवास पास ऑनलाइन उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. शासनाच्या आपले सरकार पोर्टलसह एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲॅप्लिकेशनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन पासच्या पडताळणीसाठी क्यूआर कोडची सुविधा देण्यात आली आहे. प्रवास करताना संबंधित प्रवाशाच्या पासवरील क्यूआर कोड वाहकाने ईटीआय मशीनद्वारे स्कॅन करायचा आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ईटीआय मशीनवर पासधारकाची संपूर्ण माहिती दिसणार आहे. यामध्ये प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, पासची वैधता कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे, यासह अन्य आवश्यक माहिती उपलब्ध होणार आहे.

वाहकाने ईटीआय मशीनवर दिसणारी माहिती आणि प्रवाशाने सादर केलेले ओळखपत्र यांची पडताळणी केल्यानंतर पात्र प्रवाशाला प्रवासाची परवानगी द्यायची आहे. प्रवासा दरम्यान ऑनलाइन पासवरील क्यूआर कोड ईटीआय मशीनद्वारे स्कॅन होत नसल्यास प्रवाशांनी घाबरून जाऊ नये. अशा वेळी ०८०६५९०३२७२ किंवा ०८०६५९०३२७३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून पासची पडताळणी करता येणार आहे. ऑनलाइन सुविधेमुळे एसटीच्या प्रवास पास व्यवस्थेत महत्त्वाचा बदल होणार असून, प्रवाशांचा वेळ वाचण्याबरोबरच पास वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे.

प्रवाशाची ओळख पटविण्यासाठी वैध ओळखपत्राची तपासणी केली जाणार आहे. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच डिजिलॉकरमध्ये उपलब्ध असलेले वैध ओळखपत्रही पडताळणीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. पासवरील माहिती व ओळखपत्रातील माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच प्रवाशाला प्रवासाची अनुज्ञा देण्यात येणार आहे.

मोबाईलमधील पीडीएफ पासही वैध

ऑनलाइन पद्धतीने काढलेला पास प्रवाशाने प्रिंट काढून जवळ ठेवला तरी तो वैध राहणार आहे. त्याचबरोबर पासची पीडीएफ प्रत प्रवाशाच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यास तीदेखील वैध मानली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पासची कागदी प्रत सोबत ठेवण्याची सक्ती राहणार नाही

आगारांत सूचना फलकावर माहिती देण्याचे निर्देश

ऑनलाइन पासच्या सुविधेबाबत सर्व आगार व विभागीय पातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना माहिती देण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. तसेच प्रवाशांना या सुविधेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक आगारातील सूचना फलकावर ऑनलाइन पासबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. वाहकांनाही ऑनलाइन पास तपासणीची कार्यपद्धती समजावून सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT