Purna Taluka Assault Molestation case
पूर्णा : कावलगाव (ता. पूर्णा) येथे एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची आणि त्याच्या आईचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास, कावलगावातील १६ वर्षीय मुलगा फिल्टरवरून पाणी आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी गावातील काही व्यक्तींनी त्याला रस्त्यावर थांबवून, आईविषयी अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि हातातील कुलूप व दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलगा जखमी झाला.
या घटनेची माहिती मिळताच मुलाची आई आपल्या मुलासह संबंधित आरोपींच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली. तेव्हा आरोपींनी महिलेलाही अश्लील भाषेत शिवीगाळ केली, मारहाण केली आणि अंगावरील ब्लाऊज फाडून तिचा विनयभंग केला. तसेच, दोघांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
जखमी महिलेवर कावलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तिच्या तक्रारीवरून गिरीष देशमुख, निवृत्ती देशमुख, गंगाधर पिसाळ, अनिल पिसाळ आणि गोरखनाथ पिसाळ या पाच जणांविरोधात चुडावा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सपोनि सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण मुखेडकर करत आहेत. या घटनेमुळे कावलगाव परिसरात खळबळ उडाली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.