Drought Management pudhari photo
परभणी

Drought Management: दुष्काळावर मात करण्यासाठी शासनासोबत लोकसहभागही महत्त्वाचा!

नदी पुनरुज्जीवन, शेताच्या बांधावर वृक्षलागवड आणि जलसंधारणातून पाणीप्रश्न सुटू शकतो

पुढारी वृत्तसेवा

शब्दांकन : सुभाष कच्छवे

परभणी : गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्याची ओळख दुष्काळवाडा अशी रुढ झाली आहे. मराठवाड्याच्या पाचवीलाच दुष्काळ पुजला आहे. दुष्काळावर सकारात्मक विचार करत भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्य बाबासाहेब जामगे यांनी अभ्यासपूर्ण चिंतन केले आहे. शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड आणि जलसंधारणातून दुष्काळाच्या प्रश्नावर मात करता येवू शकते. आपली शेती पाणीदार करता येवू शकते, असा विश्वास बाबासाहेब जामगे यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यात यंदा पावसाने खंड दिल्याने शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे. नदीचे पुनरुज्जीवन, जलसंधारण, शेताच्या बांधावर वृक्षलागवड आणि पाण्याचे नियोजन या माध्यमातून दुष्काळाची तीव्रता कमी करता येऊ शकते, असे मत बाबासाहेब जामगे यांनी व्यक्त केले. यंदा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीला मोठा फटका बसला आहे.

पूर्वी एकरी सहा ते साडेसहा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा तीन क्विंटलच्या आसपास उत्पादन मिळाले आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना तुलनेने कमी नुकसान झाले आहे. त्यामुळे पाणी उपलब्धता आणि शेती उत्पादन यांचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट होते. सोयाबीनच्या बाजारभावाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिका, ब्राझील यांसारख्या देशांतील सोयाबीन उत्पादनाचा परिणाम भारतीय बाजारभावावर होत असतो. शासनाने आयात-निर्यात धोरण आखताना देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे.

सोयाबीनला योग्य भाव मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने समन्वयाने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नदीचे पुनरुज्जीवन ही काळाची गरज दुष्काळावर उपाययोजना करताना नदीच्या पात्राकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. अनेक गावांमधून नद्या वाहतात; मात्र पावसाळ्यानंतर त्यांची पात्रे कोरडी पडतात. नदीच्या पात्रात योग्य ठिकाणी जलसंधारणाची कामे, लहान बंधारे आणि पाण्याचे साठे निर्माण केल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. मासळी नदीच्या उदाहरणातून त्यांनी नदी पुनरुज्जीवनाचे महत्त्व स्पष्ट केले. नदीच्या पात्रात योग्य तांत्रिक नियोजन करून पाणी अडविणे, गाळ काढणे आणि पाण्याचा साठा वाढविणे यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घ्यावा. मात्र, नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

स्वतःच्या शेतात जलसंधारणाची कामे केल्यामुळे पाण्याचा साठा वाढविण्यास मदत झाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. शेतातील विहिरी, आड आणि नदीपात्राच्या जवळ पाणी साठविण्याच्या योग्य संरचना तयार केल्यास शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही पाण्याचा आधार मिळू शकतो. नदीच्या पात्रात मुख्य प्रवाहाला अडथळा न आणता योग्य ठिकाणी लहान जलसंधारणसंरचना उभारणे, शेताच्या बांधावर पाणी अडविणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

अशा कामांसाठी तांत्रिक मार्गदर्शन घेऊनच पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. शेताच्या बांधावर वृक्षलागवड हा दुष्काळावर दीर्घकालीन उपाय म्हणून वृक्षलागवडीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेत स्थानिक हवामानाला अनुकूल झाडे लावावीत. लिंब, बाभूळ, करवंद, सागवान, महागुणी, मलबार लिंब यांसारख्या झाडांची योग्य ठिकाणी लागवड करता येऊ शकते.

झाडांमुळे मातीची धूप कमी होण्यास, जमिनीतील ओलावा टिकविण्यास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. मात्र, पिकांशी स्पर्धा होणार नाही आणि पाण्याचा अतिरिक्त ताण निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने वृक्षलागवडीचे नियोजन करणे गरजेचे आहे. लोकसहभागातूनच दुष्काळावर मात करता येते, दुष्काळ निवारणाची जबाबदारी केवळ शासनाची नाही. गावातील नागरिक, शेतकरी, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाची कामे करावीत.

प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात पाणी अडविण्यासाठी प्रयत्न केले, तर त्याचा फायदा संपूर्ण गावाला होऊ शकतो. पूर्वजांनी गावाच्या परिसरात निर्माण केलेल्या जलस्रोतांचे संवर्धन करणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे. पाणी, जमीन आणि वृक्ष यांचे नियोजनबद्ध संवर्धन केल्यास भविष्यात दुष्काळाची तीव्रता कमी करता येईल. शासनाच्या योजनांचा लाभ घेतानाच नागरिकांनी स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे, असा संदेशही त्यांनी दिला.

सांगली येथील बंधारा तब्बल ७० वर्षांपासून सांगलीकरांची तहान भागवत आहे. असेच बंधारे मासोळी नदीच्या पात्रात बांधण्यात आले तर नदीचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास बाबासाहेब जामगे यांनी व्यक्त केला. त्यासाठी त्यांच्याकडे असलेली योजनाही त्यांनी सांगीतली. बंधाऱ्याच्या अलिकडील भागात छोटे-छोटे आड बांधले तर पाणीसाठा वाढविण्यास मदत होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बंधाऱ्याच्या अलिकडे नदीच्या पोटात पण स्वतःच्या शेतात आड बांधले तर निश्चितच पाणीसाठा वाढविण्यास मदत होणार असल्याची भावना बाबासाहेब जामगे यांनी व्यक्त केली. जामगे इतरांना स्लला देण्याशिवाय थांबले नाहीत, तर त्यांनी स्वखर्चातून नदीचे खोलीकरण केले असून कोरड्याठाक पडलेल्या नदीत आज पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही पाणी दिसून येत आहे.

नदीच्या पोटात स्वतःच्या शेतात आड

गंगाखेड तालुक्यातील माखणी येथे मासोळी धरण आहे. मासोळी नदी माखणी पासून निघून रावराजूर पर्यंत ३६ कि.मी.चा प्रवास करते. त्यातील ४ कि.मी. नदी ही कौडगाव शिवारातून वाहते. मासोळी नदीअंतर्गत ५२ गावांचा शिवार येतो. मासोळी नदीवर गंगाखेडचे कार्यसम्राट आ. रत्नाकर गुट्टे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले यांच्या पुढाकारातून सांगली पेंटर्न टाईप एक बंधारा कौडगाव शिवारात बांधला आहे. आ. रत्नाकर गुट्टे यांनी बंधाऱ्याच्या उर्वरीत कामासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती बाबासाहेब जामगे यांनी केली आहे.

संबंधीत बंधाऱ्याचे कंत्राटदार आंभोरे यांचे स्वीयसहायक सोळंके यांनी पाणी संपल्यावर बंधाऱ्याची खोलीकरण करून घेवू, असे सांगीतले होते. त्या कामासाठी त्यांनीही पुढाकार घ्यावा, अशी विनंती बाबासाहेब जामगे यांनी केली आहे. कौडगाव भागात आणखी ३ सांगली पॅटर्न बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणीही बाबासाहेब जामगे यांनी केली आहे. हे बंधारे झाले तर कौडगावा शिवारात ४ कि. मी. अंतराचा शिवार सुजलाम-सुफलाम होईल, असे मत जामगे यांनी व्यक्त केले. यामुळे कौडगाव ग्रामस्थ आ. गुट्टे यांचे आभारच मानतील आणि यामुळे मासोळीचेही पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल, असे बाबासाहेब जामगे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT