Nanded MGNREGA Scam : विहीर न खोदताच निधी उचलल्याचे अहवालात स्पष्ट

दौलापूर मनरेगा प्रकरण; जि.प.चे सीईओ महेश पाटील यांच्या कारवाईकडे लक्ष
Nanded MGNREGA Scam
Nanded MGNREGA Scam pudhari photo
Published on: 
Updated on: 

राजेंद्र कांबळे

बिलोलीः मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचे पंचायत समिती बिलोलीच्या चौकशी अहवालात नमूद असतानाही, या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सिंचन विहिरींचे प्रत्यक्ष खोदकाम न करता मस्टर व मूल्यांकनाच्या आधारे निधी उचलल्याचा स्पष्ट उल्लेख चौकशी अहवालात करण्यात आला आहे. तरीही अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याकडे सादर होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला, परंतु कारवाईबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायत कोटग्याळ/दौलापूर अंतर्गत मौजे दौलापूर येथील मनरेगा योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामाबाबत गंगाराम रुक्माजी गायकवाड व अन्य तक्रारकर्त्यांनी अनियमिततेचे आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने पंचायत समिती बिलोलीच्या चौकशी समितीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून संबंधित अभिलेख, मस्टर, मोजमाप पुस्तिका व मूल्यांकनाची तपासणी केली.

Nanded MGNREGA Scam
Kinwat Railway Station Redevelopment : तीन वर्षांनंतरही किनवट रेल्वेस्थानकाचे काम अपूर्णच!

चौकशी अहवालात सिंचन विहिरींच्या प्रत्यक्ष खोदकामाबाबत गंभीर बाबी समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. विहिरींचे खोदकाम झाले नसताना मस्टर व मूल्यांकनाद्वारे रक्कम काढल्याचे निरीक्षण चौकशी अहवालात नोंदविण्यात आले आहे.

त्यामुळे हा प्रकार केवळ तक्रारीपुरता मर्यादित न राहता, अधिकृत चौकशी अहवालात नोंद झालेल्या बाबींमुळे प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीला महत्त्व प्राप्त झाले आहे. बिलोलीचे गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार यांनी नेमलेल्या चौकशी समितीने संबंधित कामांची पाहणी व कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल वरिष्ठ प्रशासनाकडे सादर केला. या अहवालात कामाच्या प्रत्यक्ष स्थितीबाबत आणि अभिलेखातील नोंदींबाबत विसंगती निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासून नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित असताना, दीड महिन्यापासून कोणती ठोस कारवाई झाल्याची माहिती समोर न येणे ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.

Nanded MGNREGA Scam
Kinwat Railway Station Redevelopment : तीन वर्षांनंतरही किनवट रेल्वेस्थानकाचे काम अपूर्णच!

मनरेगा ही ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणारी आणि ग्रामीण विकासाला चालना देणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या निधीबाबत अनियमितता झाल्याचे अधिकृत चौकशी अहवालात नमूद होत असेल, तर त्यावर वेळेत निर्णय होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

अन्यथा चौकशी अहवाल तयार होऊनही कारवाई होत नसल्याचा संदेश जनतेमध्ये जाण्याची शक्यता आहे. आता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील या चौकशी अहवालावर नेमकी काय भूमिका घेतात, संबंधितांवर कारवाई करतात की अहवालच प्रशासनाच्या फाईलमध्ये अडकून राहतो, याकडे बिलोली तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  • पंचायत समिती स्तरावर चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. मात्र, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकरणात पुढील कार्यवाही का झाली नाही? अहवालातील गंभीर निरीक्षणांवर प्रशासनाने काय निर्णय घेतला? दोषींवर कारवाई प्रस्तावित आहे का ? की या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे? असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.