मानवत ः तालुक्यातील मानोली-मानवत या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या मानोली येथील नागरिकांनी संताप व्यक्त करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला. या निर्णयाचे निवेदन ग्रामस्थांनी प्रशासनाला सादर केले असून, रस्ता आधी, निवडणूक नंतर अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मानोली ते मानवत हा सुमारे साडेसात किलोमीटर लांबीचा रस्ता 15 ते 20 वर्षांपासून अक्षरशः जीर्ण अवस्थेत आहे. खड्ड्यांनी भरलेला, चिखलमय व धोकादायक बनलेला हा रस्ता नागरिकांसाठी रोजच्या प्रवासात मोठी अडचण ठरत आहे. विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करताना तासनतास त्रास सहन करावा लागत आहे. अवघ्या 15 मिनिटांचा प्रवास करण्यासाठी तब्बल एक तास लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेकडे वारंवार निवेदने दिली. मात्र प्रत्येक वेळी फक्त आश्वासनांचीच पूर्तता झाली, प्रत्यक्षात काम मात्र शून्य राहिले. साडेसात किलोमीटर रस्त्यापैकी साडेचार किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, तर उर्वरित तीन किलोमीटर रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो.
दोन्ही विभागांमधील दिरंगाई व उदासीनतेमुळे रस्ता काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मतदान न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे ठोस काम सुरू करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनावर मानोली गावातील 50 ते 100 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मानवत तालुक्यातील कोल्हा जिल्हा परिषद सर्कलमधील मानोली हे मोठे व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव असून येथील मतदानाचा निकालावर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे मानोली ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रशासन व राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.