परभणी : जायकवाडी व माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढली. दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला. गोदावरी नदीपात्रात महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून बीड, जालना, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नदीकाठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
सोमवारी (दि.22) रात्री माजलगाव परिसरात ढगफुटीजन्य पावसाची नोंद झाली. जवळा येथे १६० मिमी, रामोदा येथे १२० मिमी पावसाची नोंद झाली. जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रातही पैठण ९२ मिमी, भेंडाळा ५२ मिमी, गंगापूर ४६ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे माजलगाव धरणातून १,१५,२४३ क्युसेक, जायकवाडी धरणातून १,०३,७५२ क्युसेक पाणी अनुक्रमे सिंदफणा व गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. तसेच बीड जिल्ह्यातून वाण नदी, परभणीतून इंद्रायणी नदीमधूनही गोदावरी नदीपात्रात पाणी येत असल्याने गोदाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. घनसावंगी, अंबड व गेवराई तालुक्यातील अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. या तालुक्यांतील नद्या भरून वाहू लागल्या असून सिंदफणा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने गोदावरी नदीपात्रात ॲफलक्स निर्माण झाला. त्यामुळे पाणी मागे सरकून अनेक गावांत घुसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. गरज भासल्यास नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.
दैठणा मंडळात पावसाचा कहर; शेतशिवार जलमय
दैठणा : येथील महसूल मंडळात सोमवारी (दि. २२) रात्री जोरदार पाऊस पडला. सायंकाळी ७ वाजेपासून सुरू झालेला पाऊस मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू होता. अवघ्या ६ तासांत तब्बल ७० मिमी पावसाची नोंद झाल्याने शेतशिवार जलमय झाले. अनेक ठिकाणी ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. परिणामी शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परतीच्या जोरदार पावसामुळे अनेक बांध फुटले, नाल्यांचे पाणी थेट शेतात शिरले. इंद्रायणी नदीच्या बॅकवॉटरमुळे इर्देवाडी गावात घरांमध्येही पाणी घुसले. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य खराब झाले आहे. सततच्या पावसामुळे उभी पिके सडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. शासन नियमानुसार ६९ मिमीहून अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टीची नोंद होते. त्यामुळे दैठणा मंडळाला अतिवृष्टीग्रस्त घोषित करून तत्काळ पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पावसामुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
निम्न दुधनातून पाण्याचा विसर्ग वाढवला
सेलू : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. सोमवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजता धरणाचे १६ दरवाजे ०.६० मीटरने उघडण्यात आले. त्याद्वारे ३१९०४ क्युसेक (९०३.४१ क्युमेक्स) इतका विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सध्या धरणात पाण्याची मोठी आवक होत असल्यामुळे विसर्ग आणखी वाढविला जाण्याची शक्यता आहे, असे पाटबंधारे विभागाने म्हटले. यामुळे दुधना नदीकाठ गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जालना पाटबंधारे विभागाने दिलेल्या आदेशानुसार नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये व कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. निम्न दुधना धरण पूर नियंत्रण कक्षाकडून या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.