Maharashtra Rain : निम्मा मराठवाडा पाण्यात; पुराच्या पाण्यात गायी मरण पावल्या
ठळक मुद्दे
बळीराजावर अभूतपूर्व संकट : २२ लाख हेक्टरवरील पिके वाया
सर्वच नदी-नाल्यांना पूर; पशुधनाची मोठी हानी, शेकडो गावे पाण्यात
लष्कर, एनडीआरएफ दाखल; पुराच्या वेढ्यातून अनेकांना वाचविले, काही स्थलांतरीत
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच असून सोमवारी रात्री अनेक ठिकाणी झालेला पाऊस आणि धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने नदीकाठांवरील गावे पाण्याखाली आली आहेत. या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बळीराजावर अभूतपूर्व असे अस्मानी संकट ओढवले आहे.
आतापर्यंत विभागातील ४८ लाख हेक्टरपैकी तब्बल २२ लाख हेक्टरवरील शेती पिके जवळपास नष्ट झाल्यात जमा आहेत. बीड, धाराशिव, परभणी, लातूर जिल्ह्यातील शेकडो गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली असून, सर्वच नदी-नाल्यांना पूर आला आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी १२९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यातील परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे. पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफसह लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाचा मंगळवारी दौरा केला, तेव्हा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. रात्री मराठवाड्यातील अनेक भागाला पावसाने झोडपले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, जालना, नांदेड या आठही जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडून त्यातून गोदावरी नदीपात्रात तब्बल ९९ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. माजलगाव धरणातूनही १ लाख १५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. माजलगाव शहराला पाण्याने वेढा घातला आहे. परतीच्या पावसाने संपूर्ण मराठवाड्यात धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसांपासून बीड, धाराशिव जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कालच मराठवाड्यातील ७५ महसूल मंडळांमध्ये म्हणजे सुमारे तीनशे गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती. आता मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत चोवीस तासांत मराठवाड्यातील आणखी १२९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
विभागातील 129 मंडळांमध्ये अतिवृष्टी
मराठवाड्यात पावसाने गेल्या चोवीस तासांत आणखी चारशे गावांना झोडपून काढले आहेत. विभागात तब्बल १२९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ५७ महसूल मंडळे बीड जिल्ह्यातील आहेत. यासोबतच परभणी जिल्ह्यातील २२, धाराशिव जिल्ह्यातील २१, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
ऑगस्टमधील नुकसानीपोटी 721 कोटींचा निधी
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात पावसामुळे जूनपासून सतत पिकांचे नुकसान होत आहे. शासनाने जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीबद्दल याआधी ६९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आता ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी ७२१ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी २३१ कोटी, बीड जिल्ह्यासाठी ५६ कोटी, लातूर जिल्ह्यासाठी २४४ कोटी आणि धाराशिव जिल्ह्यासाठी १८९ कोटी रुपये या प्रमाणे हा निधी मंजूर झाला आहे. शासनाने २३ सप्टेंबर रोजी अध्यादेश जारी करून हा निधी मंजूर केला आहे.
सरासरीच्या 121 टक्के पाऊस
मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ६७९ मिमी पाऊस अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात आतापर्यंत ७५४ मिमी म्हणजे सरासरीच्या १२१ टक्के पाऊस झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात १३८ टक्के, बीड जिल्ह्यात १३७ टक्के, जालना जिल्ह्यात १२५ टक्के, नांदेड जिल्ह्यात १२४ टक्के, हिंगोली जिल्ह्यात १२३ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२० टक्के, लातूर जिल्ह्यात ११० टक्के आणि परभणी जिल्ह्यात १०५ टक्के पाऊस झाला आहे.
पूर परिस्थिती : मराठवाड्यात कुठे काय?
धाराशिव :
वाशी, भूम, कळंब आणि परंडा या चार तालुक्यांत अतिवृष्टी
१७ गायी, १५ वासरे, शंभर कोंबड्यांचा मृत्यू
परंडा तालुक्यांत लष्कराचे पथक मदतीला
धाराशिवला ९२ गावे बाधित, शेतीचे नुकसान
लातूर
उजनीजवळील पुलाच्या दोन्ही बाजुला पाणी
जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
औसा तालुक्यात नद्यांना पूर, अलमला गावकऱ्यांनी रात्र जागून काढली
रायगव्हाण प्रकल्प ओसंडला, चार वर्षानंतर शंभर टक्के पाण
परभणी
मानवतला गोदावरी व दुधना नदीला पूर, तीन गावांचा संपर्क तुटला
गंगाखेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
सोनपेठ तालुक्यात पूरस्थिती, अडीचशे नागरिकांचे स्थलांतर
सेलू येथे खरीप पिकांची लागली वाट
बीड
बीड जिल्ह्यात शाळांना सुटी जाहीर
सिंदफणा, गोदावरी, बिंदुसरा नदीला महापूर
माजलगावत पुराचे पाणी शहरात शिरले
नांदूर येथील २३ नागरिकांची सुरक्षित सुटका
जालना
अंबड तालुक्यातील गल्हाटी नदीला मोठा पूर
पिठोरी सिरसगाव पुराने वेढले
आन्वा गाव ते आन्या पाडा पूल वाहुन गेला
घनसावंगीत पावसाचे पाणी घरात
हिंगोली
टेंभुर्णी परिसरात ढगफुटी सदृश पावसाचा हाहाकार
औंढ्यात तीन महिलांचे युवकाने वाचविले प्राण
कुरूंदा, जवळा बाजार परिसरात अतिवृष्टी
उघडी नदीत अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका
नांदेड
नांदेडला मांजरम तलाव फुटला
सूर्यदर्शन नसल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले
मुखेड येथे रस्त्यासाठी आघाडीचे आंदोलन
सततच्या पुरामुळे नदीकाठावरील नागरिक भयभयीत
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील १२ महसूल मंडळात अतिवृष्टी
वैजापूर येथे भिंत कोसळून दोघे गंभीर जखमी
पैठण तालुक्यात दक्षिण
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात ८४ हजार क्यूसेकने विसर्ग
सोयाबीन, कपाशी, मकाचे प्रचंड नुकसान
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, पावसामुळे मराठवाड्यात खरिपाची सोयाबीन, कपाशी, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जूनपासून १५ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात १५ लाख ९७ हजार हेक्टरवरील पिके पावसामुळे बाधित झाली होती. गेल्या सात दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून, त्याचे पंचनामे झाले आहेत. या सात दिवसांत सुमारे सहा लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आतापर्यंत खरिपाच्या एकूण ४८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २२ लाख हेक्टरवरील पिके जवळपास नष्ट झाली आहेत.

