जलतारा अभियानाला परभणीत गती; पाच शोषखड्ड्यांचे खोदकाम file photo
परभणी

Parbhani News : जलतारा अभियानाला परभणीत गती; पाच शोषखड्ड्यांचे खोदकाम

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे श्रमदान

पुढारी वृत्तसेवा

'Jaltara' campaign gains momentum in Parbhani; five soak pits excavated

परभणी, पुढारी वृत्तसेवा : पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात जलतारा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, (सायाळा खटिंग) येथे शनिवारी (दि. ७) पाच शोषखड्ड्यांचे खोदकाम करण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संदीप घोन्सीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी पी. एम. जाधव आणि विस्तार अधिकारी (पंचायत) राजाराम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई. १३६, जिल्हा शाखा परभणी यांच्या पुढाकाराने आयोजित या श्रमदानात विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी गटविकास अधिकारी पी. एम. जाधव, ज्ञानोबा दुधाटे, सरचिटणीस राजाराम सोळंके, उपाध्यक्ष पुष्पा काळे, जिंतूर तालुकाध्यक्ष राजेंद्र पारवे, परभणीचे संतोष जाधव, पूर्णेचे केशव जवंजाळ, पाथरीचे सर्जेराव गमे, प्रभाकर दुधाटे, काशिनाथ जुकटे, ग्रामसेवक पतसंस्थेचे अध्यक्ष भीमराव ढगे, उपाध्यक्ष महेश राव, संचालक प्रसाद चौधरी, राम पवार, परमेश्वर कदम, उद्धव खुपसे आदींची उपस्थिती होती.

तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी व्ही. एस. वटाणे, कनिष्ठ सहाय्यक राजेश भुसेवाड, शाखा अभियंता विठ्ठल गिनगिने, व्याख्याता शारदा सामाले यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे पदाधिकारी व सदस्यांनी श्रमदान केले. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते जमिनीत मुरावे, भूजलपातळीत वाढ व्हावी आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी, हा शोषखड्डे निर्मितीचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी न करता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः श्रमदानात सहभागी होत लोकसहभागातून जलसंधारणाचा संदेश दिला.

सर्व ग्रा.पं.नी पुढाकार घ्यावा

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्य आवाहन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात जलतारा प्रकल्प व पावसाचे पाणी संकलन याबाबत जनजागृती केली जात आहे. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील पाच शोषखड्ड्यांची निर्मिती हा त्याचाच एक भाग आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन जलतारा प्रकल्प उभारावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. संदीप घोन्सीकर यांनी केले.

लोकचळवळीत रूपांतर करा

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवली पाहिजे. जलतारा अभियान केवळ शासकीय उपक्रम न राहता त्याचे व्यापक जलचळवळीत रूपांतर व्हावे. गावागावांत जलसंधारणाची कामे लोकसहभागातून सातत्याने राबविण्याचे आवाहन गटविकास अधिकारी पी. एम. जाधव यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT